🌟मराठवाड्यातील 2 हजार शेतकर्यांनी घेतला लाभ : 400 क्विंटल बियाणे विक्री🌟
परभणी : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 18 मे रोजी खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषि विद्यापीठ निर्मित ज्वारी,मूग,तूर व सोयाबीणच्या 400 क्विंटल बियाणांची विक्री करण्यात आली.
विद्यापीठाच्या बिज प्रक्रिया केंद्रावर खरीप हंगामासाठी बियाणे विक्रीचा शुभारंभ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, माजी कृषि आयुक्त उमाकांत दांगट, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य दिलीप देशमुख व भागवत देवसरकर, तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, कुलसचिव संतोष वेणीकर, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रगतिशील शेतकरी सुधीर अग्रवाल, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, व बिज प्रक्रिया केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
बियाणे विक्री मध्ये मुख्यत्वे खरीप ज्वारी जैव संपृक्त वाण (परभणी शक्ती), मुग (बीएम 2003-2), तुरीच्या लाल वाणामध्ये (बीडीएन 716, बीएसएमआर-736) तुरीच्या पांढ-या वाणांमध्ये (बीडीएन 711, बीएसएमआर 853, व गोदावरी), सोयाबीन (एमएयुएस 162,एमएयुएस 158 व एमएयुएस 612), भरड धान्य राळा व नाचणी, कापुस सरळ वाण (एन एच 1901 बीटी, एन एच 1902 बीटी), कापुस देशी वाण (पीए 810) या वाणाच्या बियाण्याची विक्री करण्यात आली. विद्यापीठ संशोधन वाणांच्या बियाणे खरेदीसाठी मराठवाडा विभागातुन 2000 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी पहिल्याच दिवशी लाभ घेतला. यामध्ये सोयाबीन (300 क्विटल), तुर (90 क्विंटल) मुग (10 क्विंटल), ज्वार (01 क्विटल) व कापसाचे (1.50 क्विटल) असे एकूण 400.02 क्विंटल बियाणाची विक्री करण्यात आली. विद्यापीठाच्या परभणी येथील बिज पक्रिया केंद्रावर कार्यालयीन वेळेत बियाणे विक्री सुरु आहे. विद्यापीठ आंतर्गत, कापुस संशोधन केंद्र नांदेड, कृषि विज्ञान केंद्र छ. संभाजीनगर, कृषि विज्ञान केंद्र खांमगाव, कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर, कृषि विज्ञान केंद्र बदनापूर, गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर, कृषि महाविद्यालय गोळेगाव व कृषि महाविद्यालय आंबेजोगाई, आदी ठिकाणी लवकरच बियाणे विक्रीस उपलब्ध होईल, असे सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे यांनी कळविले आहे.....
0 टिप्पण्या