🌟वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु इन्द्र मणि ‘व्हॉइस चान्सलर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित....!


🌟प्लस नाइनवन मिडियाचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गुलाटी व सहसंस्थापक दुबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान🌟

परभणी : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या कृषि शिक्षणातील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व संस्थात्मक विकासातील योगदानाची दखल घेत उत्कृष्ट नेतृत्वासाठी त्यांना ‘व्हॉइस चान्सलर ऑफ द इयर फॉर एक्सेप्शनल लिडरशिल’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             प्लस नाइनवन मिडिया या शिक्षण क्षेत्रात नवोन्मेष व गुणवत्ता वाढविणार्‍या प्रतिष्ठित संस्थेमार्फत गुरुवार दि.१५ मे २०२५ रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या आठव्या हायर एज्युकेशन इनोव्हेशन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी समिट अ‍ॅन्ड अवॉर्ड्स-२०२५' या राष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान प्लस नाइनवन मिडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गुलाटी व सह-संस्थापक आशुतोष दुबे यांच्या हस्ते कुलगुरु इंद्र मणि यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय शिखर संमेलनात देशभरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरु, अध्यक्ष, संचालक, अधिष्ठाता व प्राचार्य यांनी सहभाग नोंदवला होता. या मंचावर उच्च शिक्षणातील आव्हाने, संधी, आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे बदल यावर विविध परिसंवाद आणि सादरीकरण झाले.

             कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना या समारंभात प्रमुख पाहुणे व सन्मानार्थी पुरस्कार विजेते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी ‘उच्च शिक्षणाचा नवविचार: नवप्रवर्तन, उद्योगसमन्वय आणि डिजिटल रूपांतरणाच्या माध्यमातून भविष्यकालीन विद्यापीठांची उभारणी’ या विषयावर झालेल्या उच्चस्तरीय परिसंवादात सहभाग घेतला. या वेळी त्यांनी डिजिटल अ‍ॅग्रीकल्चर, शैक्षणिक-उद्योग-शासन (एआयजी) सहकार्य व कृषि विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान-आधारित बदलांबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. तसेच, त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.

या परिसंवादाचे संचालन पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सायली गणकर यांनी केले. पॅनेलिस्टमध्ये मेरीटोचे  सह-महानिर्देशक फईझ वर्सी, पुणे येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे  संचालक डॉ. सफिया फारुकी, फ्लेम विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. पराग शहा, आय टी एम कौशल्य विद्यापीठाचे  प्रतीकुलपती डॉ. लक्ष्मी मोहन, सिंबायोसिसचे व्यवसाय कार्यवाहक संचालक राजेश खन्ना आणि कोपरगाव -शिर्डी येथील संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष अमित कोल्हे आदी मान्यवरांचा सहभाग होता.

           या परिषदेत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील आघाडीचे शैक्षणिक तज्ञ एकत्र आले. या परिषदेत भारतातील उच्च शिक्षणाच्या भविष्यासाठी नवकल्पना, रोजगारक्षमता आणि डिजिटल परिवर्तन हे प्रमुख अंग म्हणून ओळखले गेले. परिषदेच्या महत्त्वाच्या सत्रांमध्ये ‘उच्च शिक्षण प्रवेशांसाठी प्रमाणित मूल्यमापन : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवेशांसाठी संधी व आव्हाने’ या विषयावर बंद दरवाज्यांमागील चर्चा झाली. तसेच, विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठीच्या तयारीसंबंधी प्लेसमेंट सेल आणि परीक्षा प्रणालीतील सुधारणा यावरही सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेत शिक्षण क्षेत्रात येणार्‍या तंत्रज्ञानावरही सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे भविष्यात शिक्षण अधिक प्रभावी आणि सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला गेला. या सत्रांनी भविष्यातील विद्यापीठांना अधिक सक्षम आणि उद्योगसज्ज बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटा दाखवल्या आहेत.

            या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना मिळालेला हा सन्मान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेस, संशोधनातील नवोन्मेषास आणि डिजिटल विस्तारास मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील थेट मान्यता आहे. हा पुरस्कार विद्यापीठाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे. भविष्यातील सक्षम, विज्ञानाधिष्ठित व व्यावसायिक कृषि नेतृत्व घडविण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयदृष्टीला यामुळे नवे बळ मिळाले आहे. या यशस्वी सन्मानामुळे संपूर्ण विद्यापीठात नवीन ऊर्जा, उत्साह आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यापीठाच्या समस्त कुटुंबाच्या वतीने  अभिनंदन करण्यात येत आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या