🌟भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांची काय परिस्थिती होईल हे आता जगाने पाहिले - संरक्षणमंत्री राजनाथसिंह
नवी दिल्ली :- भारतविरोधी दहशतवाद्यांनी भारतमातेच्या मस्तकावर हल्ला करून अनेक कुटुंबांचे कुंकू (सिंदूर) पुसले. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. आता दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या आकांसाठी सीमापलीकडील जमीनसुद्धा सुरक्षित नाही. भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने शौर्य आणि प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांची काय परिस्थिती होईल, हे आता जगाने पाहिले आहे अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.
'ब्रह्मोस एअरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटर'चे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते रविवारी आभासी पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी राजनाथ म्हणाले की, उद्घाटनासाठी मी स्वतः येणे आवश्यक होते. पण देशात जी परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे मी दिल्लीत थांबलो. संरक्षण क्षेत्रात भारताला पुढे नेण्यासाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र फॅक्टरी महत्त्वपूर्ण असणार आहे. यापुढेही दहशतवाद्यांवर ठोस कारवाई सुरूच राहणार आहे."
"ऑपरेशन सिंदूर ही फक्त लष्करी कारवाई नाही, तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे हे ऑपरेशन दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे आणि त्याच्या लष्करी सामर्थ्याचे, क्षमतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन आहे. भारत दहशतवादाविरुद्ध जेव्हा कारवाई करतो तेव्हा सीमेपलीकडील जमीनही दहशतवाद्यांसाठी आणि त्यांना पोसणाऱ्यांसाठी सुरक्षित राहत नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे," असेही त्यांनी सांगितले.
"पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी ठिकाणांनाच लक्ष्य केले नाही, तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने धैर्य आणि शौर्य तसेच संयम दाखवत अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करून योग्यप्रकारे प्रत्त्युत्तर दिले. भारतीय लष्कराचा दरारा पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत पोहोचला," अशा शब्दांत त्यांनी भारतीय सैन्याचे भरभरून कौतुक केले.......
0 टिप्पण्या