🌟'ऑपरेशन सिंदूर' मागील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या शिष्टमंडळातून तृणमूल बाहेर....!

 


🌟केंद्र सरकारने ७ सर्वपक्षीय पथके वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवण्याची केली घोषणा🌟

कोलकाता : भारत-पाकिस्तान तणावानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' मागील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचाही या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला होता. मात्र, या शिष्टमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतला आहे. या शिष्टमंडळांमध्ये भाजपसह काँग्रेस आणि इतर पक्षातील खासदारांचाही समावेश आहे. परदेशात पाठवल्या जाणाऱ्या या नेत्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही होते. मात्र, युसूफ पठाण इतर खासदारांसोबत जाणार नसल्याची माहिती ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने रविवारी दिली. युसूफ पठाण किंवा तृणमूल पक्षातील इतर कोणताही खासदार या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले. मात्र, या निर्णयामागील कारण तृणमूलने दिलेले नाही. पक्षाकडून याबाबत केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे.

💫पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने काय म्हटले ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या तृणमूलने सांगितले की सर्वात आधी राष्ट्र येते आणि राष्ट्र संरक्षणासाठी आवश्यक असलेली कोणतीही कारवाई करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आपल्या सशस्त्र दलांनी देशात अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे, यासाठी आपण सर्वच नेहमीच त्यांचे ऋणी राहू, परराष्ट्र धोरण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. म्हणूनच, आपले परराष्ट्र धोरण ठरवण्याची आणि त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची परवानगी केवळ केंद्र सरकारलाच द्यायला हवी, असे तृणमूलने म्हटले आहे.

💫केंद्र सरकारने ७ सर्वपक्षीय पथके वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवण्याची केली घोषणा :-

केंद्र सरकारने ७ सर्वपक्षीय पथके वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवण्याची घोषणा केली. ही पथके 'ऑपरेशन सिंदूर' बद्दलची माहिती सर्व देशांना देतील, तसेच या कारवाईमागील सत्य सांगणार आहेत. त्याशिवाय पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचाही पर्दाफाश केला जाईल. सरकारच्या परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय पथकांमध्ये भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जेडीयूचे संजय कुमार, द्रमुकच्या कनिमोझी, राष्ट्रवादी (शरद पवार) सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. हे सर्व वेगवेगळ्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करतील. एकूण ५१ नेत्यांना परदेशात पाठवले जात आहे. हे शिष्टमंडळ ३२ देशांसह ब्रुसेल्समधील युरोपियन युनियनच्या मुख्यालयालाही भेट देणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या