🌟भारतात सर्वत्र यावर्षी सरासरी इतका पाऊस : मान्सून संदर्भात हवामान खात्याचा पहिला अंदाज जाहीर....!

 


🌟त्यापूर्वी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये देशभरात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसू शकतो🌟

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाकडून काल सोमवार दि.०७ एप्रिल २०२५ रोजी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना 'आयएमडी'चे संचालक एम.महापात्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की अल निनोचा प्रभाव कमी असल्यामुळे यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे याबाबत सविस्तर अंदाज नंतर जाहीर करण्यात येईल.

यापूर्वी सन २०२३ मध्ये अल निनोचा मोठा प्रभाव मान्सूनवर पडल्याने मान्सूनच्या पावसाच्या प्रमाणात सरासरी ८ टक्के घट झाली होती तर गेल्या वर्षी ना निनाच्या प्रभावामुळे ८ टक्के अतिरिक्त मान्सूनचा पाऊस पडला २०२३ मध्ये अल निनोमुळे कोरडा दुष्काळ पडला होता तर २०२४ मध्ये ना निनामुळे ओला दुष्काळ होता. मात्र, यंदा सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अल निनोच्या प्रभावावर मान्सूनचा अंदाज बांधता येत असतो अल निनोची निर्मिती ही प्रशांत महासागराचे तापमान वाढल्यामुळे होते. अल निनोचा परिणाम हा भारतातील मान्सून काळात पडणाऱ्या पावसावर होत असतो. अल निनो वाढत्या प्रभावामुळे भारतातील पर्जन्यमानामध्ये सरासरीच्या तुलनेत घट होते......

भारतात सर्वत्र उष्णतेची लाट :-

यावर्षी मान्सून सामान्य होण्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये देशभरात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसू शकतो. तापमान सरासरी पेक्षा अधिक असणार आहे. देशातील काही भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या देखील वर जाऊ शकते. हे तापमान सरासरी तापमानाच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने अधिक आहे. पूर्व, उत्तर भारतामध्ये प्रचंड उष्णता पाहायला मिळू शकते, तर महाराष्ट्रात देखील पुढील दोन महिने प्रचंड उकाडा जाणवणार आहे, असे महापात्रा यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या