🌟सार्वजनिक भिम व बुद्ध जयंती मंडळाने आंबेडकरी जनसमुदायासह सर्वधर्मीय सर्व समाज बांधवांचे केले आभार व्यक्त🌟
पुर्णा :- पुर्णा शहरामध्ये दि.१४ एप्रिल २०२५ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व, प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचा उत्सव अतिशय दिमाखदार आणि भव्य स्वरूपामध्ये पूर्णेतील तमाम आंबेडकरी जनसमुदायासह सर्व धर्मिय समाजातील जनतेने एकत्रितपणे संपन्न केला त्याबद्दल सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळातर्फे सन्माननीय अध्यक्ष परभणी भुषण उत्तमभैया खंदारे यांनी सर्वांचे जाहीर आभार व्यक्त केले.
महामानव परमपूज्य बाबासाहेबांच्या विचार तत्वज्ञानावर प्रेम करणारे आणि मानणारे जगभरामध्ये अनेक माणसं आहेत त्यामुळे निर्विवादपणे बाबासाहेबांची जयंती म्हणजे सर्वांसाठी सणच आहे असे आम्ही विश्वासपूर्वक मानतो पुर्णा शहर हे आंबेडकरी चळवळीचं केंद्रस्थान आहे अनेक सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक चळवळीला या पुर्णा शहराने बळ दिलेलं आहे बाबासाहेब या सर्व चळवळीचे व मनुष्यमात्रांचे ऊर्जाकेंद्र आहेत हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी पूर्णेत साजरी झालेली जयंती ही सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळ-२०२५ यांनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करून वेळ आणि परिश्रम देऊन भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मिरवणूक अतिशय शांततेत व मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालेली दिसून आली याचे सर्व श्रेय आम्ही सुजान भिमसैनिकांना देतो कारण त्यांच्या मुळेच हे सहज शक्य झाले खरं पाहता भिम जयंती व त्याची मिरवणूक हा अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करणारा विषय वाटतो खरा... मात्र पूर्णेतील बाबासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या व प्रेम असणाऱ्या भिम अनुयायांनी सर्व प्रश्नाला जनू रोखठोक उत्तरच दिले आणि मिरवणूक शांततेत पार पाडली अभूतपूर्व सहकार्य केले, त्याबद्दल जयंती मंडळ आपले आभार मानत आहे.
पूर्णेतील १४ एप्रिल ची भीमजयंती व मिरवणूक अनेक चांगल्या गोष्टीची नोंद करायला भाग पाडेल, असं आम्हाला जाणवलं. त्यामध्ये व्यसनमुक्त भीम जयंतीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून मंडळा कडून घेण्यात आलेले 'व्यसनमुक्ती शिबीर' आणि त्यासाठी मंडळाने घेतलेले परिश्रम पूर्णेकर विसरणार नाहीत,भीम अनुयायांची अभूतपूर्व एकता,वार्ड निहाय तरुण मित्रांनी केलेली सजावट- रोषणाई- वैचारीक बॅनर-विविध सामाजिक, रेल्वे कर्मचारी संघटनांनी केलेली शीतपेयांची व्यवस्था... याशिवाय मिरवणुकीमध्ये महिला व मुलींचा असलेला लक्षणीय सहभाग जो या मिरवणूकीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात होता त्यांचा भीम जल्लोष म्हणजे बंदिस्त जीवन जगायला भाग पाडणाऱ्या जातीव्यवस्थेला खणखणीत उत्तर आहे, असं दिसत होतं. ही किमया केवळ आणि केवळ बुद्धाच्या,बाबासाहेबांच्या विचारामुळेच घडून येत आहे. हे मान्यच करावे लागेल. या मिरवणूकी मध्ये सर्व धर्मिय बांधव सुद्धा आनंदाने व उत्साहाने बाबासाहेबांच्या जयंती मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणूकीचा आंनद घेत होते, असही समाधानाचं चित्र यानिमित्ताने पाहायला मिळालं.या जयंती मध्ये जिल्हा प्रशासन-तालुका प्रशासन चे उच्च पदस्थ अधिकारी-कर्मचारी, जिल्हा व तालुका स्तरावरील उच्च पदस्थ पोलीस अधिकारी-कर्मचारी, महावितरण चे उच्च पदस्थ अधिकारी-कर्मचारी, नगर परिषदेचे उच्च पदस्थ अधिकारी-कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, नगर परिषदेचे सर्व आजी-माजी नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष- नगरसेवक आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे व शिस्तबद्ध नृत्य सादर करून बाबासाहेबांना अभिवादन करणारे पंचशील नाटय ग्रुप, रमाई लेझीम पथक व इतर सर्व कलाप्रकार उन्हाची पर्वा न करता सादर करणारे गुणी कलावंत यांनी या मिरवणुकीला "चार चांद लावले" असं म्हटलं तर ते वावग ठरू नये... हे सर्व भीम अनुयायांच्या सहकार्याने व मदतीने व्यवस्थित पार पडले... याच समाधान आहेच... या पुढेही अनेक सांस्कृतिक व बौद्धीक कार्यक्रम आपण घेत आहोत यामध्ये असेच सहकार्य आपण करावे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनःश्च एकदा सर्वांचे जयंती मंडळाच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक जाहीर आभार मानतो आणि थांबतो... सर्वांना सन्मानाचा जयभीम...
✍️ उत्तमभैया मुगाजी खंदारे
अध्यक्ष- सार्वजनिक भीम व बुद्ध
जयंती मंडळ- २०२५
0 टिप्पण्या