🌟भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृतिगंध.....!


🌟महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत उभारलेला पहिला पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौकात🌟

✍️ मोहन चौकेकर 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज १४ एप्रिल रोजी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस केवळ एक उत्सव नसून, प्रेरणास्रोत आहे. बाबासाहेबांचा विविध विषयांवरील सखोल अभ्यास अद्वितीय होता. राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, कामगार हक्क, शेती आणि ग्रामीण विकास या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या विचारांचे द्रष्टेपण आजही तितकेच समर्पक वाटते. त्यांचे विचार केवळ भारतातच नव्हे, तर जगभर पोहोचले त्यामुळेच जगभरात त्यांच्या स्मृती जागवणारी स्मारके उभारण्यात आली आहेत. ही स्मारके म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्कांचे जागतिक प्रतीक आहेत.

💫जगातील पहिला पुतळा - कोल्हापूर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत उभारलेला पहिला पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौकात ९ डिसेंबर १९५० रोजी उभारण्यात आला. जगभरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक पुतळे असल्याची नोंद आहे; मात्र, कोल्हापूर येथील मराठा नेते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातील बिंदू चौकात महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे ९ डिसेंबर १९५० रोजी उभारण्यात आले होते. महात्मा फुले यांचा पुतळा बाबुराव पेंटर यांनी साकारला होता, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाळ चव्हाण यांनी निर्माण केला. खास बाब म्हणजे, बाबासाहेबांनी स्वतः कोल्हापूर भेटीदरम्यान हा पुतळा पाहिला होता.

💫महू : जन्मभूमीचे स्मारक :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांची लष्करी नोकरी होती आणि तेथेच त्यांचे वास्तव्य होते. आज महू हे ‘आंबेडकर नगर’ म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांच्या जन्मस्थळी सरकारने उभारलेले स्मारक हे लाखो लोकांना प्रेरणा देणारे ठिकाण बनले आहे. दरवर्षी येथे लाखो लोक भेट देतात.

💫टोकियो,जपान : बौद्ध विहारांतील आदरांजली :-

जपानमधील, विशेषतः टोकियो येथील बौद्ध विहारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष सन्मानाने स्थान दिले गेले आहे. त्यांच्या मूर्ती, छायाचित्रे आणि कार्याचे वर्णन करणारे फलक या विहारांमध्ये लावले गेले आहेत. काही ठिकाणी त्यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाचेही औचित्याने आयोजन केले जाते. जपानी बौद्ध भिक्षू बाबासाहेबांना नवबौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान मानतात. डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेल्या नवयान बौद्ध धर्माची समतावादी मांडणी जपानी समाजालाही प्रभावित करणारी ठरली आहे. आज टोकियोतील हे बौद्ध विहार केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाची जिवंत प्रतीकं बनली आहेत.....                                  ‌

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या