🌟असे प्रतिपादन पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरु हभप.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले : पसायदान प्रवचनमालेचा समारोप🌟
सेलू (दि.14 एप्रिल २०२५) - पसायदानाचा खरा अर्थ जर आपण पाहिला तर पसायदानात संपूर्ण मानवी जीवनाची परिपूर्णता आहे.पसायदान हे समजून घेतले व जीवन जगताना अंगिकारले तर माणसातील दोष निघून माणसाला जीवनाचा सार समजेल असे प्रतिपादन पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरु ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.
येथील साई नाट्यमंदिरात पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या सुश्राव्य वाणीमधून पसायदान या वर प्रवचन माला दि 12 ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती."चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,बोलते जे अर्णव,पियुष्याचे" या ओवीवर देगलूरकर महाराज यांनी पुष्प गुंफले.प्रवचन मालेचे हे सहावे वर्ष आहे.सुरुवातीला ,संत ज्ञानेश्वर माऊली व माजी नगराध्यक्ष सेलूभूषण ऍड.वसंतराव खारकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वसंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर,ऍड.उमेशराव खारकर यांनी देगलूरकर महाराज यांचा सत्कार केला.
यावेळी प्रवचनात बोलतांना श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले की,संत ज्ञानेश्वर यांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान लिहिले.मानवाने कल्पतरू,अमृत,चिंतामणी या तिन्ही गोष्टी पाहिल्या नाहीत,या सर्व गोष्टी अनुश्रावीक आहेत, पण यांच्या श्रवणाने व्यक्तीला नक्कीच लाभ होतो.ज्ञानेश्वरांनी पसायदानात संतांचे वर्णन देखील केले आहे.संतांचा उदय हा मानव जातीच्या कल्याणासाठी होत असतो.संत महात्मे हे तापहीन मार्तंड आहेत.यावेळी पसायदानात असलेला सार देगलूरकर महाराज यांनी सांगितला.
या प्रवचनात अभंग गायन प्रसिद्ध गायक सखाराम उमरीकर ,हार्मोनियम शंतनू पाठक,बासरी अर्जुन कसाब,मृदंग प्रकाश सुरवसे,तबला शिवाजी पाठक यांनी साथ दिली.सूत्रसंचालन ह.भ.प.संजय पिंपळगावकर यांनी केले तर आभार वसंत प्रतिष्ठानचे ऍड.उमेश खारकर यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश कुरुंदकर, केशवराज बाबासाहेब विद्यालयातील जेष्ठ शिक्षक संजय धारासुरकर व सर्व शिक्षक,प्रसाद खारकर,विनोद मोगल,नंदकुमार धर्माधिकारी,अजित मंडलिक आदींसह वसंत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या