🌟मरण स्वस्त होत आहे ? त्या ११ कामगारांपैकी ७ महिला कामगारांचा जागीच मृत्यु.....!


🌟कारण १५० रुपयें रोजंदारीसाठी त्या ७ महिला कामगारांना आपला जीव गमावावा लागला🌟

परखड सत्य लेखक :- दिपक पुर्णेकर

दि. ४ एप्रिलची ती बकासुरी सकाळ. वेळ सकाळचे साधारणता ७ वाजले होते. एक ट्रॅक्टर ज्यामध्ये एकूण ११ जण कामगार पैकी ९ स्त्रिया तर २ पुरुष कामगार होते. हे ट्रॅक्टर त्या ११ जणांना घेऊन भुईमूग निंदनासाठी शेतात घेऊन जातांना ड्रायव्हरचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने अख्खा ट्रॅक्टरच चक्क विहिरीत कोळसला. ड्रायव्हरने चालत्या ट्रॅक्टर मधुन उडी घेत पळ काढला. अन् काय क्षणात होत्याच नव्हतं झालं. कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची मावशी, तर कुणाची पत्नी त्या विहिरीने आपल्या उदरात गडप केली होती. मृत्यूचं जणू तांडवच उभं राहिल होतं. त्या ११ कामगारांपैकी ७ महिला कामगारांचा जागीच मृत्यु झाला होता. आलेगाव (ता.जि.नांदेड) शिवारातील शेतात तो भयाणं प्रकारचा अपघात घडला होता.

   ६  एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ गायकवाड यांच्या समवेत मी पूर्णेकडून गुंज(ता.वसमत जि.हिंगोली) गावाकडे निघालो. सकाळचे १० वाजले होते. उन्हातील धग वाढतच होती.  आम्ही मोटारसायकल वरून गुंज गाव जवळ करत होतो. साधारणता ११:३० वाजता आम्ही गावात पोहचलो. गाव तस मोठं होत. आम्ही पहिले वेळेस गावात आल्यामुळे आम्हाला गावातील काहीच माहिती नव्हती.विचारपूस करत-करत आम्ही गावाच्या बाहेरील बाजूस आलो. तिथे एका व्यक्तीस त्या अभागी माता भगिनींचे घर एका व्यक्तीला विचारले तो व्यक्ती म्हणाला, सरळ जावा १ कि. मी. अंतरावर एक माळ लागलं त्या माळावरच ती लोकं राहत असतात. अन् गाडी गावाच्या बाहेर माळाच्या दिशेने निघाली. माळ जवळ येतं होता.माळावर बऱ्याच गाड्यांचा ताफा दिसत होता. अखेर आम्ही त्या उजाड , उदास, अन् भकास माळावर येऊन पोहचलो. कुडवं, जुनी पत्रे , ताडपत्रीचा आधार घेऊन ती २०-२५ घरं भेदरल्यागत उभी असल्याची भासत होती. रस्ते,शाळा, आरोग्यसेवा,पाणी,नाल्या, वीज, याचा त्या ठिकाणी लवलेशही दिसत नव्हता.  त्या माळावर एका भल्यामोठ्या झाडाखाली शे-दोनशे लोकं बसली होती. पुढ जाऊन बघितलं तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू आ. सचिनभाऊ साठे हे अगदी पोटतिडकीने पीडित कुटुंबाची विचारपूस करत सांत्वन करत होते. थोड्या वेळात त्यांचा ताफा निघून गेला. मी तेथील प्रत्येक पीडिताचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हढ्यात समोरून प्रा. रामचंद्र भरांडे साहेबांचा ताफा त्या झाडाखाली येताना दिसला. पुन्हा मोठी बैठक बसली. आया-बहिणींचा,लहान लेकरांचा आक्रोश, किंकाळ्या ऐकूच येत होत्या. तो आक्रोश ऐकून मनं हेलावून जात होत. प्रा.भरांडे साहेबांनी माळावरील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. शिक्षणाचं प्रमाण तिथं नगण्यच! गरिबी, दारिद्र्य, अज्ञान, व्यसनाधीनता यात ती वस्ती खितपत पडली होती.शेतकाम, ऊसतोडीचे काम करून ती लोकं आपला उदरनिर्वाह करत होती.विकासापासुन ती लोकं कोसो दुर होती. तेव्हढ्यात तहसीलदार मॅडम त्या ठिकाणी आल्या.प्रा. भरांडे साहेबांनी त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. शेवटी साहेबांनी जाता-जाता एक वाक्य मॅडमला बोलले ते फार महत्वाचे आहे. ते म्हणाले, आपल्यातील अधिकारी बाजूला ठेवा अन् ही सुद्धा माणसे आहेत हा विचार पुढं ठेवून यांच्या विकासासाठी काय काय करता येईल ते करा.५-७ लाख रुपये देऊन त्यांचे काही भले होणार नाही. त्यांना कायम विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काय उपाय योजना करता येतील त्या करा. या सर्व वस्तीचे शहराच्या ठिकाणी गायरान जमिनी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे जेणेकरून ही लोक विकासाच्या , रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतील असे मत साहेबांनी सुचविले. मॅडम सकारात्मक चर्चा करून गेल्या.प्रा.भरांडे साहेबांनी एका कुटुंबातील पीडित सदस्यास विचारले की किती रु रोजंदारीवर ह्या महिला कामावर गेल्या होत्या ? 

त्याचे उत्तर ऐकून मी थक्क झालो.तुटपुंज्या १५० रु रोजंदारीवर त्या महिला कामावर गेल्याचे कळाले ते ऐकून मनात एक विचार आला की, आज आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. पण तिथल हे भयाणं वास्तव पाहुन मनात प्रश्न उपस्थित झाला की, खरंच आम्ही स्वातंत्र्य झालो का ? तसेच नामदेव ढसाळ यांनी व्यवस्थेला विचारलेला "स्वातंत्र्य हे कंचा गाढवीचं नाव है रं?" हा सवाल मनात पुन्हा येतो आज मरणं स्वस्त होत आहे. कारण १५० रु रोजंदारीसाठी त्या ७ महिला कामगारांना आपला जीव गमावावा लागला आहे.सरकारने पीडित कुटुंबांना कायमस्वरुपी न्याय मिळवून द्यावा ही माफक अपेक्षा व्यक्त करतो! 

त्या माता भगिनींना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली...💐🙏🙏💐

लेखक :- दिपक पुर्णेकर

  मो.नं.-८१८०००८१५९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या