🌟उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी - चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांत पदार्पण करत आहेत. ७५ वर्षांत सेवानिवृत्त हा नियम भारतीय जनता पक्षाचा असून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना ७५ वर्षांचा भाजपचा नियम लागू करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे झाल्यानंतर त्यांना सेवानिवृत्त घ्यावी लागेल असा हल्लाबोल शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी सेवानिवृत्त घ्यावी हे जनता ठरवेल असा पलटवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर केला आहे.
वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मोदींचा उत्तराधिकारी कोण हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. स्वतः नरेंद्र मोदी यांनीच पक्षात ७५ वर्षाचा सेवानिवृत्तीचा नियम केला. हा नियम लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना लागू होता. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी ७५ वर्षाचे होत आहेत, त्यामुळे त्यांना नियमाने निवृत्त व्हावे लागणार आहे, असे राऊत म्हणाले.....
💫निवृत्तीचा कोणताही नियम नाही - चंद्रशेखर बावनकुळे
उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे ७५ वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणात असे म्हटलेले नाही. भारतीय संविधानात असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई (८३ वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. परंतु संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही, असा पलटवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर केला आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असे बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
0 टिप्पण्या