🌟विरोधकांनी चर्चेसाठी १२ तासांचा वेळ मागितला पण सरकारने फक्त ८ तासांचा वेळ दिला🌟
नवी दिल्ली : लोकसभेत प्रचंड गदारोळात आज बुधवार दि.०२ एप्रिल २०२५ रोजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले विधेयक सादर होताच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या विधेयकावर लोकसभेत तब्बल आठ तास चर्चा होणार आहे. त्यानंतर हे विधेयक अवाजवी मतदानाने पारीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर देशभर चर्चा सुरु आहे. मागच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून लोकसभेत मांडण्यात आले होते. लोकसभेने हे विधेयक चिकित्सा व सर्व सहमतीसाठी संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठविले होते. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीतही या विधेयकावर गरमागरम चर्चा झाल्यानंतर काही सुधारणा करुन केंद्र सरकारने हे विधेयक आज लोकसभेत मंजुरीसाठी ठेवले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले. त्यावेळी विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. केंद्र सरकारने या विधेयका संदर्भात सर्वांच्या शंकांचे निरसन करीत सुधारीत विधेयक आपण लोकसभेत सादर करीत असल्याचे अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले. तरी देखील विरोधकांनी चर्चेसाठी १२ तासांचा वेळ मागितला. पण सरकारने फक्त ८ तासांचा वेळ दिला आहे. सरकार या विधेयकाला मुस्लिमांच्या हितासाठी सुधारणात्मक पाऊल म्हणत आहे तर विरोधी पक्षांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. हे विधेयक संविधानाचे उल्लंघन आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधकांच्यावतीने केला जात आहे. विधेयक मांडतांना किरेन रिजिजू म्हणाले की, आज आमच्या सरकारने हे विधेयक आणले नसते तर दिल्ली वक्फ बोर्डाने संसदेची इमारत व आसपासच्या जागेवर दावा करण्याची तयारी केली होती. या विधेयकाला इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी विरोध दर्शविला आहे. तर भाजपसह सत्ताधारी एनडीए तील जनता दल (संयुक्त), तेलगु देसम, शिवसेना (शिंदे) या घटक पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. लोकसभेतील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे खा. गौरव गोगोई म्हणाले की, गरीब मुसलमांनाना लाभ देण्यासाठी हे सुधारणा विधेयक असल्याचा भाजपचा दावा फोल आहे. भाजपचे किती मुस्लिम खासदार आहेत हे आधी सांगावे. गरीब मुसलमानांचा कळवळा दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी भाजप प्रणित अनेक राज्यात ईदच्या दिवशी मुस्लिमांना नमाज पठन करण्यास विरोध केला. यावेळी अखिलेश यादव यांचेही तडाखेबंद भाषण झाले. रात्री उशिरापर्यंत या विधेयकावर चर्चा होवून आजच अवाजवी मतदान घेवून विधेयक पारीत केले जाईल असे सांगण्यात येत आहे......
0 टिप्पण्या