🌟अमेरिका-चीन मधील 'टॅरिफ वॉर' टोकाला चीन आक्रमक : चीनचा अमेरिकेतील वस्तूंवर आता १२५ टक्के कर....!


🌟चीनच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की अमेरिकेने चीनवर असामान्यरीत्या अधिक टॅरिफ लावलेले आहेत🌟

बीजिंग : अमेरिका-चीन या दोन देशांमधील 'टॅरिफ वॉर' आता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील वस्तूंवरील टॅरिफ १४५ टक्क्यांपर्यंत वाढविल्यानंतर चीननेही आक्रमक भूमिका घेत अमेरिकेतील वस्तूंवर १२५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, अमेरिकेने पुन्हा टॅरिफ वाढवले तर आम्ही याहून अधिक टॅरिफ लावणार नाही, असेही चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढील निर्णयांकडे दुर्लक्ष करणार असल्याचेही चीनने म्हटले असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे चीनच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेने चीनवर असामान्यरीत्या अधिक टॅरिफ लावलेले आहेत. या टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापार नियमांचे, मूलभूत आर्थिक तत्त्वांचे उल्लंघन झालेले आहे. हे पूर्णपणे एकतर्फी आहे. ही दडपशाही आणि जबरदस्ती आहे.

मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, जर अमेरिका चीनच्या हितावर गंभीर हल्ले करत राहिली, तर आम्ही ठामपणे प्रतिकार करू आणि शेवटपर्यंत लढू. तथापि, त्यांनी हेही स्पष्ट केले की, जर अमेरिका पुढेही चीनच्या वस्तूंवर अतिरिक्त टॅरिफ लावत राहिली, तर चीन याकडे दुर्लक्ष करेल आणि यापुढे कोणतीही प्रतिशोधात्मक पावले उचलणार नाही ट्रम्प यांनी टॅरिफला ९० दिवसांची स्थगिती दिली असली तरी चीनला मात्र त्यातून वगळले आहे. त्यामुळे चीनवर टॅरिफ सुरू झाले आहे. अमेरिकेच्या या टैरिफ हल्ल्यांवर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युरोपियन युनियनला आवाहन केले होते की, त्यांनी चीनसोबत हातमिळवणी करावी आणि या एकतर्फी दडपशाहीविरोधात एकत्र उभे राहावे.

💫युरोपीयन महासंघाला आवाहन :-

अमेरिकेने १४५ टक्के आयात शुल्क लादल्याच्या घोषणेनंतर चीनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता चीनने भारतानंतर युरोपियन महासंघाला एकत्रितपणे या विरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेने युरोपियन महासंघालाही आयात शुल्क लादले होते. मात्र, युरोपियन महासंघाने प्रत्युत्तर दिल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय ९० दिवसांसाठी स्थगित केला, याचा उल्लेख करत चीनने युरोपियन महासंघाला हे आवाहन केले. मात्र, जर अमेरिका बेपर्वा वागत असेल तर चीन हे व्यापार युद्ध लढण्यास तयार असल्याचेही चीनने म्हटले आहे.

अमेरिकेच्या या व्यापार कर युद्धाच्या विरोधात लढण्यासाठी आणि ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत व चीनने एकत्र आले पाहिजे, असे चीनने म्हटले होते. यानंतर आता चीनने युरोपियन महासंघालाही एकत्रितपणे लढण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धातून बाहेर पडण्यासाठी युरोपियन महासंघ आणि चीनने एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

💫जिनपिंग काय म्हणाले ?

स्पेनचे पंतप्रधान अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांच्याशी बीजिंगमध्ये झालेल्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी युरोपियन महासंघाला चीनसोबत एकत्र काम करण्याचे आवाहन केले. जेणेकरून ते अमेरिकेबरोबरच्या वाढत्या व्यापार वादाचा सामना करू शकतील. जिनपिंग म्हणाले की, चीन आणि युरोपने संयुक्तपणे त्यांच्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आणि अमेरिकेच्या एकतर्फी धमकी देणाऱ्या धोरणांना संयुक्तपणे विरोध केला पाहिजे. तसेच यामुळे दोन्ही पक्षांचे हक्क आणि हितसंबंध जपले जातीलच. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय आणि समानता देखील बळकट होईल.

💫स्पेनचे पंतप्रधान काय म्हणाले ?

स्पेनच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे की, व्यापारावरून सुरू असलेल्या तणावामुळे युरोपियन महासंघ आणि चीनमधील सहकार्य थांबू नये. स्पेन आणि युरोप चीनसोबतचा व्यापार गमावत आहेत. आपण या व्यापार तणावाला आपल्या परस्पर संबंधांमध्ये आणि भविष्यातील सहकार्यात अडथळा बनू देऊ नये, असे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या