🌟परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी....!



🌟संविधानामुळे प्रत्येकाला प्रगतीची संधी - कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि🌟


परभणी
:- परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज सोमवार दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या प्रतिमांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते पुष्पांजली, दीपप्रज्वलन आणि धूपार्पणाने करण्यात आली. यावेळी आम्रवन महाविहार (देवगाव फाटा) येथील पूज्य भिक्खू संघरत्न यांना डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी याचना केली आणि भिक्खूजीनी त्रिसरण, पंचशिल वंदना सर्वांना दिली. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. त्यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या कार्याचा वेध घेतला. त्यांनी शिक्षण, शील, प्रज्ञा व करुणेच्या डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीवर भर दिला. संविधानामुळे मिळालेल्या समानतेच्या अधिकारामुळे प्रत्येकाला प्रगतीची संधी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण हे शक्ती असून त्याचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते घेतल्यानंतर माणूस गुरगुरणारच या त्यांच्या संदेशावर ही जोर देवून समाज उन्नतीसाठी प्रत्येकानी शिक्षणावर अधिकाधिक भर द्यावा असे सांगितले. महाराष्ट्र हे पुरोगामी असून मुलींच्या शिक्षणामध्ये विशेष भर देत आहे. बाबासाहेबांचे अतिउच्च शिक्षण, त्यांचा जागतिक प्रवास यातून त्यांनी चांगले आणि महत्त्वपूर्ण विचार संविधानात उतरविले, त्यांनी अतिशय कमी कालावधीत महत्वपूर्ण संशोधन आणि लेखन केले. ते सतत आपले ज्ञान वाढवत असत, त्यांचे व्यक्तिमत्व आणि राहणीमान अतिशय प्रभावी आणि जगावर छाप पाडणारे होते. त्यांनी महिलांना शिक्षणासह सर्व अधिकार आणि सन्मान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. दरवर्षी त्यांची जयंती साजरी करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करून स्मृतीस उजाळा दिला जातो आणि त्यांचे विचार आपल्या मनात प्रभावीपणे ठासले जातात. या  महापुरुषांचा विचार आणि आदर्श यावर सर्वांनी चालावे. याप्रमाणेच विद्यापीठ कार्य करत असून प्रशासन आणि कर्मचारी उच्चांकी कार्य करत आहे. सध्या महाराष्ट्रासह देशात विद्यापीठ आघाडीवर कार्य करत असून भविष्यात असेच कार्य करण्याची यावेळी आपण सर्वांनी प्रतिज्ञा करू, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे माननीय कुलागुरुनी नमूद केले.

या वेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विद्यापीठ उप अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रेम कांबळे आदींची उपस्थिती होती शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संघर्ष करण्याचे आवाहन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विद्या, प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, या पंचतत्त्वांचा अवलंब करून महामानवांचे विचार अंगीकारावेत. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू समजून सांगत “ते होते म्हणूनच आज आपण आहोत” (we are because he was)  असे नमूद केले कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वकोश असल्याचे सांगत त्यांचे कार्य सर्वव्यापी आणि सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळाला. शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांनी सर्वांना दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे कर्तव्य निभावावे तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. याबरोबरच तसेच प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा व वेळेचा काही भाग समाजहितासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले डॉ. गजेंद्र लोंढे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या भूमिकांचे कौतुक केले. या सादरीकरणाने आणि लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली.

प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.रामप्रसाद खंदारे व अंतिम वर्षातील विद्यार्थी अमोल घुफसे यांनी तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले या कार्यक्रमात जयंती उत्सव समितीद्वारे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ५ वाजता विद्यापीठातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाला. यासाठी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी समन्वय साधून उत्कृष्ट कार्य केले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या