🌟काँग्रेसला मुस्लिमांबद्दल खरोखरच आपुलकी आहे का ? : मग काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लिम का नाही ?

 


🌟हरयाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेस पक्षावर जोरदार टिका🌟

हिसार : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सोमवार दि.१४ एप्रिल २०२५ रोजी वक्फ सुधारणा विधेयक आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी वक्फ कायदा बदलण्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. इतकेच नव्हे तर काँग्रेसला मुस्लिमांबद्दल खरोखरच आपुलकी आहे का ? आपुलकी असेल तर काँग्रेस त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी मुस्लिम व्यक्तीची नेमणूक का करत नाही, तसेच काँग्रेस निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांची ५० टक्के तिकिटे मुस्लिम उमेदवारांसाठी राखीव का ठेवत नाही, असे सवालही मोदी यांनी उपस्थित केले.

येथील महाराजा अग्रसेन विमानतळावरून अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले त्यावेळी ते बोलत होते. विमानतळावर त्यांच्या हस्ते नव्या टर्मिनल इमारतीचा पायाभरणी समारंभही पार पडला त्यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.

वक्फ नियमांत बदल

ते म्हणाले, वक्फ बोर्डाने त्यांच्या मूळ उद्देशाप्रमाणे काम केले असते तर आज भारतातील मुसलमान गरीब राहिले नसते, त्यांना गरिबीत दिवस काढावे लागले नसते, पंक्चर दुरुस्त करण्यासारखी कमी दर्जाची कामे करत बसावे लागले नसते. काँग्रेसने संविधान व सामाजिक न्यायाची किंमत मोजून आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी वक्फच्या नियमांमध्ये बदल केल्याचा आरोपही त्यांनी केला. केला.

मुस्लिमांचे तुष्टीकरण

काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी संविधानाचा शस्त्र म्हणून वापर केला. सत्ता कायम ठेवण्यासाठी आणीबाणी लावली. आणीबाणीच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी संविधानाच्या मूळ भावनेची हत्या केली. आपल्या संविधानात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्यांबाबत उहापोह करण्यात आला आहे. परंतु, काँग्रेसने ते कधीही लागू केले नाहीत. काँग्रेसने केवळ मुस्लिम कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण केले. आपण (एनडीए) आणलेल्या नवीन कायद्याला त्यांचा विरोध हेच सिद्ध करतो. मात्र, आम्ही आणलेल्या वक्फ कायद्याचा उद्देश केवळ गरीब व वंचित मुसलमानांचा विकास करणे हा आहे. मुस्लिम महिलांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

मोदी पुढे म्हणाले, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष त्यांच्या सरकारला प्रेरणा देते. प्रत्येक निर्णय आणि धोरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. पण विरोधी पक्षाने (काँग्रेसने) सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला एक साधन बनवले. आणीबाणीच्या काळात काँग्रेसने सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संविधानाला चिरडण्याचा प्रयत्न केला. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला. पण दुर्दैवाने काँग्रेस यालाही विरोध करत आहे, अशी टीकाही मोदींनी काँग्रेसवर केली.

डॉ. आंबेडकरांचा अपमान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचे स्वप्न पाहिले होते. संविधानात त्यांनी सामाजिक न्यायाची व्यवस्था केली होती. त्यातही खंजीर खुपसून काँग्रेसने संविधानाच्या या तरतुदींना लांगूलचालनाचे माध्यम बनवले. सत्ता लुटण्याचे एक हत्यार म्हणून काँग्रेसने संविधानाचा वापर केला. जेव्हा जेव्हा काँग्रेसला सत्तेचं संकट दिसले तेव्हा तेव्हा त्यांनी संविधान पायदळी तुडवले. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आत्म्याला नख लावले. आपल्याच हाती सत्ता राहावी म्हणून त्यांनी हे केले. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना सतत अपमानित केले. त्यांचे विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

...तर मुस्लिमांना पंक्चर दुरुस्त करीत बसावे लागले नसते

काँग्रेस निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांची ५० टक्के तिकिटे मुस्लिम उमेदवारांसाठी राखीव का ठेवत नाही, ते कधीच असे करत नाहीत आणि त्यांची तशी इच्छाही नाही. उलट ते देशातील नागरिकांचे ५० टक्के अधिकार हिरावू पाहत आहेत. काँग्रेसने खरंच मुसलमानांसाठी काही केले असते तर माझ्या मुस्लिम तरुणांना आज पंक्चर दुरुस्त करण्यात आयुष्य घालवावे लागले नसते, अशी टीकाही मोदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या