🌟जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात प्रत्यक्षात घडले भयावह सैराटकांड : ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला.....!


🌟भरलग्नात घुसून बापाने मुलीसह जावयाला धाडधाड घातल्या गोळ्या : मुलगी जागीच ठार तर जावई गंभीर जखमी🌟

✍️ मोहन चौकेकर                                                               

जळगाव : जळगाव मधील ऑनर किलिंगच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. मुलीने केलेला प्रेमविवाह केलेला बापाला पटला नव्हता. हाच राग मनात धरून बापाने जावयाच्या बहिणीच्या सुरू असलेल्या भरलग्नांत मुलीवर व जावयावर गोळ्या घातल्या.या हल्ल्यात मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडामध्ये घडली. या धक्कादायक घटनेनंतर लग्नात आलेल्या वऱ्हाडींनी गोळीबार करणाऱ्या बापावर हल्ला करत त्यालाही गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत.

किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव आहे. ते सीआरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव तृप्ती अविनाश वाघ असे आहे. तर अविनाश ईश्वर वाघ हा गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेतील पिस्तूल जप्त केलं आहे.

दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाश यांचा प्रेमविवाह झाला होता. हा प्रेमविवाह किरण मंगले यांनी कधीच मान्य केला नाही. अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त हे दांपत्य चोपडा येथे आले होते. याची कानकून किरण मंगले याला लागली. त्याने हळदीच्या ठिकाणी येऊन तृप्ती आणि अविनाशवर तीन राउंड गोळीबार केला. यात तृप्ती जागीच ठार झाली, तर अविनाशच्या पाठीत आणि हाताला गोळ्या लागल्या. अविनाश याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा तपास सुरू आहे. आरोपी किरण मंगले यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असे जळगावचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या