🌟आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ.....!


🌟त्यामुळे पालकांना निवड यादीतील बालकांचे प्रवेश १० मार्चपर्यंत निश्चित करता येणार🌟

 ✍️ मोहन चौकेकर

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी निवड झालेल्यांपैकी आतापर्यंत केवळ ४६.५७ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या जागांवर बालकांच्या प्रवेशासाठी आणखी संधी मिळावी, म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाने निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी आता मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पालकांना निवड यादीतील बालकांचे प्रवेश १० मार्चपर्यंत निश्चित करता येणार आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’ नुसार (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील आठ हजार ८६३ शाळांमधील एकूण एक लाख नऊ हजार ८७ रिक्त जागांसाठी तीन लाख पाच हजार १५२ अर्ज आले होते.

त्यातील एक लाख एक हजार ९६७ बालकांची निवड यादी शिक्षण विभागाने जाहीर केली. आतापर्यंत निवड यादीतील केवळ ४७ हजार ४९२ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ही मुदतवाढ दिली असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

💫प्रवेशासाठी निवासाचा पत्ता ग्राह्य धरण्याची सूचना :-

या प्रवेश प्रक्रियेत बालकांच्या पालकांनी शाळा निवडलेल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वत:च्या मालकीची निवासी व्यवस्था नसेल, परंतु पालकांकडे निवासी पुरावा म्हणून ते राहत असलेल्या ठिकाणचे रेशनिंग कार्ड, वाहन परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड आणि राष्ट्रीयकृत बॅंकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा त्या ठिकाणाचा असेल, तर तो निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास पालक राहत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी,’ असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट सांगितले आहे.                                        

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या