🌟एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - कुलगुरू प्रा.डॉ इन्द्र मणि
आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि म्हणाले की, आपल्या देशांमध्ये कापूस, सोयाबीन व मका ही महत्त्वाची पिके आहेत या पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी मोठा वाव आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना गुलाबी बोंड आळी मधील प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यास व्यवस्थापनाच्या उपाययोजना याविषयी जी प्रात्यक्षिके घेतली जातात त्याद्वारे इतर शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा व गुलाबी बोंड आळी चे व्यवस्थापन करावे. तसेच शेतकऱ्यांनी निवड रासायनिक कीटकनाशकाचा अवलंब न करता एकात्मिक पद्धतीनेच कीड व्यवस्थापन करावे व त्याकरिता विद्यापीठाच्या संपर्कात राहावे. तसेच प्रगतशील शेतकरी श्री रत्नाकर पाटील यांचा 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्वारा जो सन्मान करण्यात आला तो त्यांनी केलेल्या परिश्रमाची ही पावती आहे, त्यामुळे असे अनेक शेतकरी आपल्या मराठवाड्यातून निर्माण झाले पाहिजेत अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांनी शेतकरी आहे तर विद्यापीठ आहे व विद्यापीठाचे शेतकरी देव भव: या ब्रीदवाक्याला यावेळी परत एकदा अधोरेखित केले. आणि येणाऱ्या काळात विद्यापीठातर्फे कापसावर विशेष काम करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक संचालक संशोधन डॉ. खिजर बेग म्हणाले की, विद्यापीठाने नांदेड 44 सारखे कापसाचे विविध वाण तयार केले व त्यामुळे कापूस लागवडीचे आपल्या महाराष्ट्राचे व देशाचे चित्र पालटले होते अगदी त्याचप्रमाणे आता विद्यापीठाने सरळ वाणांमध्ये बी टी चे बियाणे निर्माण केले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना हे बियाणे सलग तीन वर्ष आपल्या शेतामध्ये वापरता येईल व त्याद्वारे बियाण्यावर होणारा खर्चही कमी करता येईल तसेच हे वाण योग्य निगा राखल्यास खूप चांगले उत्पन्न देतात असे दिसून आले हे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांनी आपले कपाशीचे उत्पादन वाढविण्याकडे कल द्यावा असे आव्हान त्यांनी केले. उपस्थित शेतकऱ्यांपैकी काही मोजक्या शेतकऱ्यांनी 15 क्विंटल प्रति एकर एवढे कापसाचे उत्पन्न मागील वर्षी घेतले आहे त्यामुळे इथे बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने पुढील वर्षी कपाशीचे 15 क्विंटल पेक्षा जास्त उत्पन्नाचे ध्येय ठेवावे त्याकरिता विद्यापीठातर्फे त्यांना प्रत्येक बाबीत मदत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रभारी अधिकारी तथा कापूस विद्याव्वेता डॉ. अशोक जाधव यांनी योजनेतून केलेल्या कार्याचा आढावा मांडला. तसेच या प्रशिक्षण कार्यक्रमात राष्ट्रीय अनुसंधान मिशन अंतर्गत कीटकनाशक प्रतिकारशक्ती तंत्रज्ञान तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार यावर विशेष मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात सुधारणा करता येईल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी प्रकल्पांतर्गत एकूण पाच गावातून, प्रति गाव 12 शेतकरी याप्रमाणे एकूण 60 शेतकरी निवडण्यात आले होते त्यांना यावेळी येणाऱ्या हंगामाकरिता विविध निविष्ठांचे वाटप यावेळी माननीय कुलगुरू व माननीय संचालक संशोधन यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सोबत कृषी विद्यापीठाची कृषी दैनंदिनी 2025 हेही वाटप करण्यात आली. यावेळी डॉ.ए.एस.जाधव यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान, डॉ.डी.डी.पटाईत यांनी कपाशीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन, डॉ.पी.बी.जाधव यांनी घनपद्धतीने कापूस लागवड, तर डॉ. पी. एस. नेहरकर यांनी कीटकनाशकांचा संतुलित वापर याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री रत्नाकर ढगे यांनी त्यांचे राष्ट्रपती भवनातील अनुभव व ते करत असलेल्या गटशेती विषयीचे माहिती शेतकऱ्यांना दिली त्यांच्यासोबतच श्री पंडित थोरात यांनी प्रकल्पांतर्गत घेतलेल्या कापूस लागवडी द्वारे त्यांना उत्पन्नात कशी वाढ झाली याविषयी माहिती दिली. यावेळी श्री.बाबासाहेब रणेर, श्री.प्रकाश हारकळ, सौ.उज्वला रणेर यांनीही आपले यावेळी कापूस लागवडीविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ.दिंगंबर पटाईत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.प्रशांत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कापूस संशोधन योजना येथील कृषी सहाय्यक श्री.मन्मथ तोडकर, वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री.इरफान बेग, यंग प्रोफेशनल वन श्री.नारायण ढगे, श्री. प्रशांत पंडित, श्री. सचिन रणखांब, श्री.गोविंद रणेर, श्री.गणेश जोंधळे आणि श्री.भगवान वाकडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला खानापूर, आर्वी ता. परभणी व टाकळगव्हाण लोणी, बाभळगाव ता. पाथरी व परिसरातील ८० पेक्षा जास्त शेतकरी व महिला शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला.....
0 टिप्पण्या