🌟आत्महत्येची धमकी किंवा प्रयत्न हा घटस्फोटाचा वैध आधार : उच्च न्यायालय🌟
मुंबई : कौटुंबिक व्यवस्थेत जोडीदाराने आत्महत्येची धमकी देणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हे 'क्रूरते'च्या श्रेणीत येते आणि घटस्फोटासाठी वैध कारण ठरते, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या आदेशात कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाला मान्यता दिली. महिलेने कौटुंबिक न्यायालयाच्या या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
पतीने आपल्या याचिकेत दावा केला होता की, त्याच्या पत्नीने आत्महत्या करून त्याला व त्याच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. हिंदू विवाह अधिनियमाच्या तरतुदींनुसार हे क्रूरतेच्या व्याख्येत येते, असे त्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दिलेल्या अर्जात म्हटले होते उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, कौटुंबिक न्यायालयासमोर पती व अन्य साक्षीदारांनी सादर केलेले पुरावे हे क्रूरतेचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत.
"फक्त धमकीच नाही, तर पत्नीने एकदा प्रत्यक्षात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अशा प्रकारच्या वागणुकीला इतकी तीव्र क्रूरता मानता येईल की, त्यामुळे घटस्फोट मंजूर होण्याचा आधार निर्माण होतो," असे न्यायालयाने स्पष्ट केले न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय रद्द करण्यास नकार दिला, कारण त्यात कोणतीही त्रुटी आढळली नाही, असेही न्यायालयाने नमूद केले प्रकरणानुसार हे दांपत्य एप्रिल २००९ मध्ये विवाहबद्ध झाले होते आणि त्यांना एक मुलगी आहे मात्र, पतीने दावा केला की, त्याच्या सासरच्यांचा वारंवार हस्तक्षेप होत असे आणि त्यामुळे वैवाहिक आयुष्यात अडथळे निर्माण होत होते. २०१० मध्ये पत्नी त्याचा घर सोडून माहेरी गेली आणि परत येण्यास नकार दिला, असे त्याने सांगितले.
पतीने पुढे असा आरोप केला की, पत्नीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती आणि एकदा प्रत्यक्ष प्रयत्नही केला. तसेच, तिने खोट्या तक्रारी करून त्याला व त्याच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. पत्नीने आपल्या याचिकेत दावा केला की, तिला पती व सासऱ्यांकडून छळ सहन करावा लागला आणि त्यामुळे तिने सासर सोडले......
0 टिप्पण्या