🌟परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत आनंद भरोसे यांचा स्थानिक आमदारांना इशारा🌟
परभणी (दि.२२ मार्च २०२५) : परभणी विधानसभा मतदारसंघात सन २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या दहा वर्षांपैकी साडेसात वर्ष सत्तेत असणार्या स्थानिक आमदारांनी कधी कोणता निधी आणला,कधी कोणते ठोस प्रश्न सोडवले,कधी कोणत्या प्रश्नांसाठी सरकार दरबारी प्रयत्न केला अन् निधी खेचून आणला,हे त्यांनी स्पष्ट करावे असे मत शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी आज शनिवार दि.२२ मार्च रोजी परभणीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केले स्थानिक आमदार महोदयांना आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याची सवय जडली आहे अशी टीका करीत आनंद भरोसे यांनी भूमीगत गटार योजना असो,पाणी पुरवठा योजना असो किंवा अन्य महत्वाकांक्षी विकास कामे आम्ही सरकार दरबारी पाठपुरावा करीत मंजूर करुन घेतली त्या योजनांसह कामांचे श्रेय लाटण्याचे त्यांचे प्रयत्न अक्षरशः केविलवाणे आहेत अशी खंत व्यक्त केली.
परभणी महानगरपालिकेत सत्ता नसतांना सुध्दा देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित पाणी पुरवठा योजनेकरीता ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला याकडे लक्ष वेधतेवेळी भरोसे यांनी भूमीगत गटार योजनेससुध्दा आम्ही पाठपुरावा करीत मंजूरी मिळविली. वास्तविकतः भूमीगत गटार योजनेस लवकरच निधी उपलब्ध होणार आहे, अन्य विकास कामांनासुध्दा मंजूरीसह निधी मिळणार आहे, हे हेरुनच आमदार पाटील यांनी त्याचेही श्रेय स्वतःस लाटता यावे या दृष्टीने या विधीमंडळात त्या विषयी ओरड करीत, राजीनाम्याची भाषा करीत स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशी टीका भरोसे यांनी केली.
या अधिवेशनात पीकविम्या सारख्या ज्वलंत विषयात आमदार महोदयांनी आवाक्षर काढले नाही. परंतु, शिष्यवृत्तीच्या विषयात वारंवार प्रश्न करीत त्यांनी स्वहीत दाखवून दिले, अशी कडवट प्रतिक्रिया व्यक्त करतेवेळी भरोसे यांनी सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या मृत्यू प्रकरण असो, परभणीतील जाळपोळ प्रकरणातसुध्दा व्यापार्यांच्या नुकसान भरपाईचा विषय असो विधीमंडळ अधिवेशनात आमदार महोदयांनी ब्र काढला नाही. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातसुध्दा सर्वार्थाने दुर्लक्ष केलेल्या आमदार महोदयांना जेव्हा परभणीकरांचा उद्रेक झाला त्यावेळेसच जाग आली, अशी टीका भरोसे यांनी केली. नाट्यगृहाच्या बांधकामास निधी कमी पडणार हे स्पष्ट असतांना सुध्दा सरकार दरबारी कधी पूरेसा निधी मिळावा या दृष्टीने प्रयत्न केले नाहीत, सात वर्षांपासून बसपोर्टचे काम रखडल्यानंतरसुध्दा ते त्यासाठी निधी खेचून आणून शकले नाहीत. त्याउलट आम्हीच एमआयडीसीतील पाणी पुरवठा योजनेकरीता ५० कोटी तसेच नवीन उद्योग भवन उभारण्याकरीता ४० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला हे भरोसे यांनी निदर्शनास आणून दिले. याच विषयात मुंबईत संबंधित मंत्र्यांनी दोन बैठका घेतल्यानंतरसुध्दा आमदार महोदयांना त्या बैठकांचा थांगपत्ता लागला नाही, हे ही भरोसे यांनी निदर्शनास आणून दिले.
लोअर दुधना असो, जायकवाडी सिंचन प्रकल्प पाण्याने तुडूंब भरल्यानंतर त्याचे पाणी लाभक्षेत्रास टप्प्या टप्प्याने मिळणार हे स्पष्ट असतांनासुध्दा त्याचे वेळापत्रक घोषित होण्याच्या पूर्वसंध्येस पाणी मागणी संदर्भात पत्रकबाजी करण्याचे व दुसर्या दिवशी निर्धारित घोषणा झाल्यानंतरसुध्दा त्याचे श्रेय लाटायचे, गावोगाव जलपूजन करीत फिरायचे किंवा स्वतःच्या घरी माणसे बोलावून हार-तुरे स्विकारायचे उद्योग या आमदार महोदयांनी इनामे इतबारे केले आहेत, अशी कडवट प्रतिक्रिया भरोसे यांनी व्यक्त केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी खेचून आणावा यासाठी स्थानिक आमदार महोदयांनी कधी ओळीनेसुध्दा मुंबईत, मंत्रालयात पाठपुरावा केला नाही, अशी खंतही भरोसे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, यावेळी पत्रकार परिषदेस भास्कर लंगोटे, माणिक पोंढे, बाळासाहेब पानपट्टे, गीता सूर्यवंशी, कल्पना दळवी, इक्कर पाटील, शेख शब्बीर आदी उपस्थित होते.......
0 टिप्पण्या