🌟परभणीच्या बाल वैज्ञानिकांची 'विज्ञानवारी' आयुकाला रवाना.....!


🌟आयुका पुणे येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी रवाना झाले🌟

परभणी(प्रतिनिधी) :- परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयुका पुणे येथे विज्ञानवारी उपक्रमांतर्गत नेण्यात येते. अती दुर्गम भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांच्यामधील संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने पुण्याच्या IUCCA आणि NCRA या दोन्ही संस्थांना मागील तेरा वर्षांपासून परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या विद्यार्थ्यांना जोडून देण्याचा प्रयत्न करत असते. याद्वारे समाजामध्ये विज्ञानाविषयी जागृती निर्माण होईल व भारताला नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

विज्ञानवारीतील विद्यार्थ्यांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येते. यावर्षी विज्ञानवारी तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली. पहिला टप्पा दिनांक 17 फेब्रुवारी रोजी शालेय स्तरावर घेण्यात आला. यात ऑफलाइन परीक्षेत 279 शाळा व ऑनलाईन परीक्षेमध्ये 252 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या पहिल्या टप्प्यातून एकूण 180 विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी निवडण्यात आले. यात एकूण 9 तालुक्यांमध्ये 20 फेब्रुवारीला परीक्षेचा दुसरा टप्पा घेण्यात आला. या परीक्षेत एकूण 144 विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरले. प्रात्यक्षिक परीक्षा ही आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे 23 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 63 विद्यार्थी विज्ञानवारी परीक्षेसाठी निवडण्यात आले. दि 27 तारखेला हे सर्व विद्यार्थी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथून आयुका पुणे येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी रवाना झाले.

या विज्ञान वारीला शुभेच्छा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथून निघण्याच्या अगोदर सकाळच्या सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ  इंद्र मणी यांच्या शुभहस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी  नतीशा   माथुर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या विज्ञान वारीला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कुलगुरू डॉ इंद्र मनी यांनी विद्यार्थ्यांना 'संधीचे सोने करा' असे सांगून शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी  नतिशा माथुर यांनी विद्यार्थ्यांना 'Ask why?' हा मंत्र दिला. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना व त्यामागची कारणे यांबद्दल आपल्याला प्रश्न पडून तो विचारून यांचा शोध घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी (योजना) संजय ससाने, प्रा ज्ञानोबा नाईक,  अंजली बाबर, डॉ केदार खटिंग आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  सुधीर सोनुनकर, प्रास्ताविक एस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी केले तर आभार डॉ पी आर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ बाहुबली निंबाळकर, प्रताप भोसले, डॉ रणजीत लाड,  प्रसाद वाघमारे, दत्ता बनसोडे, दीपक शिंदे, महेश शेवाळकर, अशोक लाड, नागेश वाईकर, संदीप लष्करे, प्रकाश डुबे, लक्ष्मण सोनवणे, गजानन चापके, अविनाश रेंगे, माजिद भाई,  कमल पाटील, जयश्री चोपडे आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या