🌟होळी व रंगपंचमी विशेष : होळी साजरी करण्याचे पौराणिक कारण....!


🌟होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ🌟


✍️ मोहन चौकेकर

होळी हा रंगांचा सण आहेया दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग,गुलाल लावतात.लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उस्तुकता असते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. ह्या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते या मागे दोन कारण आहे.

*होळी साजरी करण्याचे पौराणिक कारण*

राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हादला विष्णु भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयन्त केला , पण भक्त प्रल्हादने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहिण होळीकाची मदत घेतली. होळीकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून होळीकाने भक्त प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला. परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळीका भस्म झाली आसुरी प्रवृत्तीवर हा सत्याचा विजय आहे.

या कथेमधून हा संकेत मिळतो कि वाईटावर चांगल्याच विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगाचा सण आहे. या सणाची लहान मुलेआतुरतेने वाट पहात असतात. या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते.

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.

“होळी रे होळी पुरणाची पोळी” किंवा “होळीला गवऱ्या पाच पाच…डोक्यावर नाच नाच”.

लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.

*होळी साजरी करण्याचे वैज्ञानिक कारण*

होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सूस्त झालेले असते. यामुळे शारिरीक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सूस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते.

आपण भारतीय सण, उत्सव साजरे करण्यात आघाडीवर आहोत.  आपल्या सगळ्या सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सगळे निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जोडले आहेत. आपले आरोग्य, जीवनशैली आणि अध्यात्म यांच्याशी त्यांची एक अतूट अशी नाळ जुळलेली आहे. होळी येते तेव्हा भोवतालचा निसर्ग आपले रूप बदलत असतो. पानगळ होऊन झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षांना बहर येतो. आंब्याच्या मोहराने भोवतालचा परिसर धुंद सुगंधी होऊन गेलेला असतो. अशातच कडक थंडी नाहीशी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते आणि अशातच फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण येतो. या पौर्णिमेलाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. आपल्या इतर अनेक सणांप्रमाणेच हा सण अमंगलातून मंगलाकडे, वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याची प्रेरणा देतो. 

होळी हा सण भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. उत्तरेत होरी, फुलोंकी होली, लाठमार होली, दोलायात्रा तर महाराष्ट्र आणि गोव्यात होळी, शिमगा, होळी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा या नावाने, दक्षिणेत कामदहन म्हणून साजरा केला जातो. कुठे पाच दिवस तर कुठे आठ दिवस हा सण साजरा केला जातो. कामदेवाने मदनाच्या रूपात भगवान शंकरांच्या साधनेत विघ्न आणले होते. त्यामुळे शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले. होळी सण प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यामागे वेगवेगळ्या आख्यायिकाही आहेत. ढुंढा नावाची एक राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिच्यामुळे मुले भयग्रस्त झाली होती. तिच्यामुळे रोगराई पसरत होती. तिला हाकलून लावण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. शेवटी लोकांनी गावात ठिकठिकाणी अग्नी प्रज्वलित करून आणि तिला बीभत्स शिव्या शाप देऊन पळवून लावले असे म्हटले जाते. म्हणूनही होळी साजरी केली जाते. 

होळीचा दुसरा दिवस धुळवड किंवा धूलिवंदन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी होळीतील रक्षा एकमेकांच्या अंगावर उधळली जाते. राख किंवा रक्षा म्हणजेच धूळ. पण होळीतील ही राख अतिशय पवित्र समजली जाते. ती अनिष्ट गोष्टींचा नाश करते. वातावरणातील सकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढवते म्हणून आपण धूलिवंदन साजरा करतो. पण आजकाल धुळवड किंवा धूलिवंदन या शब्दाचा खरा अर्थच आपण विसरलो आहोत व  आपण रंगपंचमीचा आनंद घेतो आहे   आपल्याकडे रंगपंचीमीचे  एक आगळेवेगळे महत्व आहे.

फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमी. या दिवशी वृंदावनात राधा आणि कृष्ण रंग खेळले अशी आख्यायिका आहे. एका आख्यायिकेनुसार बरेच दिवस भगवान श्रीकृष्ण वृंदावनात गेले नाहीत. राधा आणि गोपिका यांना कृष्णाचा विरह सहन करावा लागला. राधा तर त्या विरहात जणू कोमेजून गेली. तिचा आनंदच जणू हरवला. राधेच्या दुःखी होण्याने वृन्दावनातील झाडे फुले सुद्धा कोमेजली. सृष्टीतील चैतन्य जणू हरवले. भगवान कृष्णांनी मग पुन्हा सगळी सृष्टी चैतन्यमय केली. झाडे, फुले पुन्हा बहरून आली. राधेचा रुसवा दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी तिच्या अंगावर फुले उधळली. वृन्दावनातील मंदिरात भगवान श्रीकृष्णांवर देखील फुलांची किंवा पाकळ्यांची उधळण केली जाते. 

असेही सांगितले जाते की फाल्गुन कृष्ण पंचमीला श्रीकृष्णांनी राधा, गोपिका आणि गोकुळातील समस्त स्त्रीपुरुषांना एकत्र आणून त्यांच्यासोबत रंग आणि रासक्रीडा केली. जीवन हे इंद्रधनुष्यातील सप्तरंगांप्रमाणे मोहक आणि सुंदर आहे. जीवनात संगीत, नृत्य आणि रंगांचा आनंद घ्या हेच जणू श्रीकृष्णांनी आपल्या या कृतीतून सांगितले. आपले जीवन रंगांनी, संगीताने समृद्ध व्हावे, आळस, सुस्तपणा यांचा त्याग करावा आणि उत्साहाने भरलेले रसरशीत जीवन जगावे हाच यानिमित्ताने त्यांचा आणि होळी या सणाचा संदेश आहे. त्याचबरोबर आपले पर्यावरण जपण्याचा संदेश देणारा पण हा सण आहे.

 आजच्या काळात आपल्याला होळीचा असाही अर्थ घेता येईल. समाजातील जातीभेद, उच्चनीचता, वाईट चालीरीती, प्रथा यांचा त्याग आपण करावा असाही संदेश हा सण नकळतपणे आपल्याला देतो कवी केशवसुतांच्या* शब्दांत सांगायचे तर –

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळून किंवा पुरुनी टाका

   सडत न एक्या ठायी ठाका

    सावध ! ऐका पुढल्या हाका.

    हाच खरा या सणामागील अर्थ आहे. 

 खरी होळी साजरी केली ती आपल्या देशभक्तांनी आणि क्रांतिकारकांनी. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार असा नारा लोकमान्य टिळक, महात्मा गांधींनी दिला आणि विदेशी कपड्यांची, वस्तूंची होळी करण्यात आली. अनेक देशभक्त आपल्या घरादाराची, आयुष्याची होळी करून देशासाठी हसत हसत फासावर चढले. आपणही त्यांच्या या त्यागाची जाणीव ठेवू या. आणि त्यांनी जे स्वातंत्र्य आपणास मिळवून दिले आहे ते जपण्यासाठी ज्या ज्या काही वाईट गोष्टी त्याच्या आड येत असतील अशा सर्व गोष्टींची होळी करून त्यांना श्रद्धांजली वाहू या आणि सर्वात शेवटी सांगायचे तर 'श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया' असे म्हणत त्या श्यामसुंदराला आवाहन करावे कारण 'रंगात रंग तो श्यामरंग' हेच खरे....!

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या