🌟त्यांच्या वक्तव्यामुळे भारतीय समाजात संभ्रम पसरला आहे शीख इतिहासात असली नोंद कुठेच सापडत नाही🌟
नांदेड : संत साहित्याचे अभ्यासक आणि दैनिक तरुण भारत (कोल्हापूर) संपादक श्रीरंग गायकवाड यांनी शुक्रवारी श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन केंद्र येथे एका व्याख्यानात 'संत नामदेवजी महाराज यांनी भ्रमन्ती केली पंजाब मध्ये जाऊन शीख धर्माचा पाया घातला' असे दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे त्यांनी वरील वक्तव्य परत घ्यावे अशी मागणी अध्यासन केंद्र सल्लागार समितीचे सदस्य आणी शीख धर्माचे अभ्यासक स.रविंद्रसिंघ मोदी यांनी येथे केली आहे.
शुक्रवार दि. 21 मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठाच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन केंद्र येथे श्री गुरु गोबिंद सिंघजी अध्यासन केंद्र आणी नानकसाईं फाउंडेशन नांदेड तर्फे साहित्यिक श्रीरंग गायकवाड यांचे "संत नामदेव महाराज : लौकिक व वांग्मयन योगदान " या विषया वर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मनोहर चासकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकुलगुरु डॉ अशोक महाजन, नानकसाईं फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ बोकारे,सल्लागार समितीचे अध्यक्ष स.लड्डूसिंघ महाजन,अध्यसनाचे समन्वयक डॉ दीपक शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी शहरातील गणमान्य आणी विद्यार्थियां समोर व्याख्यान देतांना व्याख्याते श्रीरंग गायकवाड म्हणाले की, पंढरीच्या श्री विट्ठलाचा समता, बंधुभावाचा संदेश देशभर पोहचवण्यासाठी संत नामदेवांनी भ्रमन्ती केली. पंजाबमध्ये जाऊन शीख धर्माचा पाया घातला. त्यांचे वरील विधान शीख इतिहासाशी तर्कसंगत नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे भारतीय समाजात संभ्रम पसरला आहे. शीख इतिहासात असली नोंद कुठेच सापडत नाही. असे रविन्द्रसिंघ मोदी यांचे म्हणणे आहे.
स. रविन्द्रसिंघ मोदी यांनी पुढे म्हंटले आहे की ई. सन 1350 मध्ये संत श्री नामदेव महाराज यांचे पंजाब मध्ये देहावसान झाले. वरील घटनेच्या 119 वर्षानंतर शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानकदेव यांचे जन्म रायभोय की तलवंडी (नानकाना साहेब) पाकिस्तान येथे झाले होते. प्रत्यक्षात संत नामदेवजी महाराज आणी गुरु नानक देवजी यांचा कधीच साक्षात्कार घडून आला नाही. गुरु नानकदेवजी यांच्या समकालीन संतांमध्ये संत रविदासजी, संत कबीरदासजी आणी इतर संतांचा उल्लेख आढळून येतो. शीख धर्माची स्थापना झाल्यानंतर श्री गुरु नानकदेवजी यांनी वेगवेगळ्या दिशांच्या चार उदासी यात्रा (धार्मिक यात्रा) करून अन्य धर्माविषयी माहिती मिळवली, गुरु वाणी, श्लोक व इतर साहित्याचे संकलन केले. त्याच्या आधारवरूनच शीख धर्माचे पंचम गुरु, श्री गुरु अर्जुनदेव यांनी श्री गुरु ग्रंथसाहेब (पोथी साहेब) संपादित केले ज्यात संत श्री नामदेवजी महाराज यांचे 62 शबद (अभंग) गुरुबाणी म्हणून रागबद्ध रुपात समाविष्ट करण्यात आले. श्री गुरुग्रन्थ साहेब मध्ये संत श्री नामदेवजी महाराज यांच्या सह इतर पंधरा भक्ताँच्या वाणीचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. सोबत शीख धर्मातील सहा गुरुं, आकरा भट्ट आणी चार शीख महापुरुषांच्या वाणींचे समावेश आहे. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शीख धर्मावर कोण्या एका धर्माचा प्रभाव नव्हता. शीख धर्माचे प्रवर्तक गुरु नानकदेवजी यांचे "बेदी कुटुंब" हे वेद लिहिणारे कुटुंब म्हणून ओळखले जायायचे. त्यांच्या कुटुम्बियांचे संत नामदेव महाराज यांच्याशी कधीच संबंध जोडले गेले नाही आणी इतिहासात तसा कोणताच उल्लेख आढळून येत नाही किंवा पुरावा मिळत नाही. गुरु नानकदेवजी यांच्या जिवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक प्रमाणित पुस्तकात तसा सन्दर्भ आढळून येत नाही. श्री संत नामदेवजी महाराज हे शीख धर्मियांसाठी पूजनीय आहेत आणी राहील. पण शीख धर्माचा पाया त्यांनी रचला हे विधान अतिश्योक्ति निर्माण करणारे आणी संभ्रम निर्माण करणारे आहे. श्रीरंग गायकवाड हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी नांदेडच्या भूमीत वरील विधान जाणीवपूर्वक केले असावे असे अनेकांचे म्हणणे आहे. अशा वेळी श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन केंद्राचे समन्वयक असलेले डॉ दीपक शिंदे यांनी बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी श्रीरंग गायकवाड यांनी केलेल्या विधानाची सत्यता तपासायला हवी होती. विविध वर्तमानपत्रात वरील बातमी प्रसारित झाली असून त्याचे वेगळे संदर्भ काढले जात आहे. तसेच सोशल मिडिया किंवा यूट्यूब चैनल्स वर देखील ते प्रसारित झाले असावे. इतिहासाच्या जाणकारांनी वरील विषयी आश्चर्य व्यक्त करायला सुरुवात केली आहे. म्हणून श्रीरंग गायकवाड यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे नाहीतर ठोस ऐतहासिक पुरावा द्यावा. अशी मागणी स. रविन्द्रसिंघ मोदी यांनी केली आहे........
बातमी संदर्भ : दैनिक दैनिक प्रजावाणी दि.22 मार्च 2025..
दैनिक नांदेड वार्ता दि.21 मार्च 2025
0 टिप्पण्या