🌟शेकडो समर्थकांसह मा.आ.सिताराम घनदाट यांनी भाजपा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला🌟
परभणी (दि.१८ मार्च २०२५) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राज्याच्या विधानसभेत तब्बल तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट यांनी आज मंगळवार दि.१८ मार्च रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात माजी आमदार सिताराम घनदाट यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्यास पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण,माजी मंत्री बबनराव लोणीकर,भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीचे माजी अध्यक्ष राहुल लोणीकर,माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, भाजपाचे परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे,महानगराध्यक्ष राजेश देशमुख, भिमराव वायवळ,ज्येष्ठ नेते ज्ञानोबा मुंढे,माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, ओबीसी आघाडीचे आनंद बनसोडे, किरण पाटील आदी नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ज्येष्ठ नेते घनदाट हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात विधानसभा निवडणूकीपुर्वी दाखल झाले होते. परंतु, या पक्षाने महाविकास आघाडीतून उमेदवारी न दिल्याने घनदाट यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीस सोडचिठ्ठी देवून वंचित बहुजन आघाडीमार्फत निवडणूक लढविली होती. त्या निवडणूकीत ते पराभूत झाले. मूळ मुंबई येथील घनदाट हे परभणी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात म्हणजे गंगाखेड या राखीव विधानसभा मतदारसंघात १९९१ पूर्वी दाखल झाले होते. ज्येष्ठ नेते उत्तमराव पाटील यांच्या आशिर्वादाने, मार्गदर्शनाखाली घनदाट यांनी भारतीय जनता पार्टीमार्फत निवडणूकही लढविली. त्या निवडणूकीत ते पराभूत झाले. परंतु, १९९४ पासून घनदाट यांनी या मतदारसंघाचे दोन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली व ते विजयीसुध्दा झाले होते. या मतदारसंघात घनदाट हे मामा या नावाने सर्वदूर परिचित आहेत......
0 टिप्पण्या