🌟महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार हप्ता....!

 


🌟लाभार्थ्यी बहिणींच्या खात्यात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रक्कम बँक खात्यात जमा होणार - आदिती तटकरे

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनांतर्गत लाभार्थी महिलांना मागील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या मार्च महिन्यात मिळणार असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या महिन्याचा लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली दरम्यान लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाडक्या बहिणींना महिना १,५०० रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार, असे महायुतीने जाहीर केले होते. निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. जुलै ते नोव्हेंबर असा पाच महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला, तर विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेंतर्गत पात्र महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे महायुतीने जाहीर केले होते. मात्र, २,१०० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कधी जमा होणार हे अद्याप तरी जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता रखडल्याची चर्चा सुरू होती. अखेर महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बँक खात्यात जमा होईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे पुढील पाच दिवसांत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.

💫अडीच कोटी महिलांना मिळाला लाभ :-

लाडकी बहीण योजनेतील ८० लाख महिलांना या योजनेतून वगळले जाणार, असा आरोप विरोधकांनी केला. मात्र, योजना जाहीर झाल्यापासून २ कोटी ४० लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभमिळाला आहे. नियमात बसणाऱ्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

💫२,१०० रुपयांचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार :-

विधानसभा निवडणुकीत जाहीर केलेला २,१०० रुपयांचा हप्ता देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिन्ही पक्षांचे नेते याबाबत निर्णय घेतील, असे तटकरे यांनी सांगितले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या