🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी रमजान ईद गुडी पाडवा व रामनवमी उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत साजरी करावी...!


🌟जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन🌟 

परभणी (दि.२६ मार्च २०२५) : परभणी जिल्ह्यातील सर्व धर्मिय समाज बांधवांनी रमजान ईद गुढी पाडवा आणि रामनवमी हे सण उत्ससाहपूर्ण वातावरणात शांततेत साजरे करावेत जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस प्रशासनाचे आपणास संपूर्ण सहकार्य राहिल त्यामुळे सदर सणांसह येणारे सर्व सण देखील आनंदात साजरे करावेत असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केले रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमी  हे सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती व विभागप्रमुखांची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. त़्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल, ग्रामीणचे पोलीस अधिकारी चंद्रशेखर देशमुख, प्रोफेशनली आयपीएस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले की, अलीकडे हिंदू व मुस्लिम समाजाचे अनेक सण एकत्र येताना दिसत आहेत, हे एक प्रकारे एकात्मतेचे प्रतिकच म्हणावे लागेल. अशावेळी समाजबांधवांनी  एकीने सण शांततेत साजरे करावेत.  सण साजरे करत असताना कुठेही गालबोट लागणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी.  कुठे अनुचित प्रकाराची  खबर मिळाल्यास त्याची माहिती पोलीसांना तात्काळ द्यावी. सुरक्षा व स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जाईल. सर्वांना  रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. 

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले की, रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमी  सण दोन्ही समाजाने सामंजस्याने व आनंदाने साजरे करावेत. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. समाजमाध्यमांवर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. परभणी  हे माझे गाव आहे, माझ्या गावात मी काहीही अनुचित घटना घडू देणार नाही, असा प्रत्येकाने ठाम विचार करुन सण आनंदात साजरे करावेत. अफवांवर विश्वास ठेवू नये. सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. 

मनपा आयुक्त धैर्यशील जाधव म्हणाले की, सण साजरे करताना नागरिकांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि सामंजस्याने सण साजरे करावेत. महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता व इतर अनुषंगिक बाबींबाबत दक्षता घेतली जाईल. त्यामुळे सर्वांनी सण आनंदाने  व उत्साहाने साजरे करावेत निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी आभार मानले. बैठकीला विभागप्रमुख, पोलीस अधिकारी, तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते... 

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या