🌟प्रत्येक दवाखान्यात क्युआर कोड लावण्याचा वैद्यकीय परिषदेने घेतला महत्वपूर्ण निर्णय🌟
✍️ मोहन चौकेकर
सर्व डॉक्टरांना वैद्यकीय परिषदेने मेल द्वारे पाठवली क्युआर कोडची लिंक ; सर्व डॉक्टरांना रुग्णालयाच्या दर्शनी भागात क्युआर कोड लावावा लागणार सर्वसामान्य नागरिकांना बोगस आणि नोंदणीकृत डॉक्टर ओळखता यावेत, यासाठी क्यूआर कोड वापरण्याचा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) घेतला आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी सर्व डॉक्टरांना मेल पाठविण्यात आला असून, रुग्णालयात दर्शनी भागात क्यूआर कोड लावण्यास सूचित केले आहे.
राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरांना हा क्यूआर कोड देण्यात येणार आहे. तो स्कॅन करताच डॉक्टरची संपूर्ण माहिती समजेल.बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे वैद्यकीय परिषदेने क्यूआर कोडचा निर्णय घेतला आहे. त्यातून डॉक्टर खरा आहे की बोगस हे लगेच कळू शकेल. बोगस डॉक्टरांमुळे अनेकदा वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होते. त्यांच्याविरोधात अनेकदा वैद्यकीय परिषदेकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर क्यूआर कोडचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असते. ही समिती वेळोवेळी छापेमारी करून बोगस डाॅक्टरांना पकडत असते; पण वेगवेगळ्या पॅथींच्या नावाखाली बोगस वैद्यकीय उपचार सुरूच असतात; पण क्यूआर कोडमुळे नेमका डॉक्टर स्पष्ट होणार आहे. ‘आपल्या डॉक्टरला ओळखा’ या उपक्रमाद्वारे नोंदणीकृत डॉक्टर निश्चित करता येणार आहे.
वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना पाठविलेल्या मेलवरून क्यूआर कोडची लिंक डाऊनलोड करून घ्यायची आहे. हा कोड क्लिनिकमध्ये किंवा नावाच्या पाटीवर लावायचा आहे.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या