🌟या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शन एसएनडीटी महिला विद्यापीठाचे ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.सुभाष चव्हाण यांनी केले🌟
पुर्णा (दि.२४ मार्च २०२५) - पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात मराठवाडा ग्रंथालय संघ छत्रपती संभाजी नगर आणि स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक ग्रंथालय सेवेतील आव्हाने या विषयावर आज सोमवार दि.२४ मार्च २०२५ रोजी एक दिवशीय मराठवाडा विभागीय कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठाचे ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ .सुभाष चव्हाण हे उपस्थित होते तर कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांची उपस्थिती होती डॉ.चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या व सार्वजनिक ग्रंथालय सेवेच्या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले एआय तंत्रज्ञान म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
येणाऱ्या काळात सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित झालेले कर्मचारीच चांगले काम करू शकतील म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .या तंत्रज्ञानामुळे ग्रंथ देवघेव , ग्रंथाची सुरक्षा आणि तत्पर सेवा देणेघेणे हे सोपे होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यशाळेत ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या संदर्भात ही त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले .
या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार गंगाधर पटणे, खंडेराव सरनाईक, हिंगोली ,वसंतराव सूर्यवंशी ,तुळजापूर ,राम मेकले, प्रभाकर कापसे, लातूर आदी सार्वजनिक ग्रंथालय संघातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कार्यकर्ते या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक ग्रंथालय सेवेच्या आणि दर्जाच्या संदर्भाने सकारात्मक चर्चा करून ग्रंथालय संघाच्या पुढील वाटचालीच्या दिशेनेही या चर्चासत्रात सादक बाधक चर्चा झाली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी ग्रंथालयाचे महत्त्व आणि सार्वजनिक ग्रंथालयाची सेवा यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संयोजक डॉ.विलास काळे यांनी आपल्या प्रस्ताविकात कार्यशाळेची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्ता पवार यांनी केले तर आभार संयोजक डॉ. विलास काळे यांनी मांनले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विलास काळे, प्रा. दत्ता पवार, प्रा.डॉ.अशोक कोलंबीकर, प्रा.डॉ.त्रिमूर्ती सोमवंशी , गिरधारी कदम, जीवन लोखंडे आदीनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या