🌟श्री हजूर साहेब नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा बोर्डावर चार वर्षापासून प्रशासकराज कायम....!


🌟गुरुद्वारा बोर्ड निवडणूक तात्काळ घेण्याची सामाजिक कार्यकर्ते स.जगदीपसिंघ नंबरदार यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी🌟


श्री हजूर साहेब नांदेड :
- श्री हजूर साहेब नांदेड येथील जगप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा बोर्डावर मागील चार वर्षापासून प्रशासक राज कायम असून राज्य शासनाच्या वतीने गुरुद्वारा बोर्ड गठीत करण्यासाठी उदासीनता दाखवत असल्याने याबद्दल याचिका करते जगदीपसिंघ नंबरदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सचखंड गुरुद्वारा बोर्डाची तात्काळ निवडणूक घेऊन लोकनियुक्त प्रतिनिधी नेमावेत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

      गुरुद्वारा बोर्डाचे व्यवस्थापन दि नांदेड श्री गुरुद्वारा सचखंड श्री हजुर  अबचलनगर साहेब अधिनियम 1956 नुसार करण्यात येते. परंतु भाटिया समितीच्या शिफारसीनुसार नवीन गुरुद्वारा अधिनियम 2023 लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. यास शीख समाजाकडून विरोध झाल्याने 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गुप्त अधिनियमाच्या प्रारूप अभ्यास करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार शासन निर्णय 15 मार्च 2024 अन्वये समिती गठित करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नवीन अधिनियमाचे प्रारूप अंतिम होणे अपेक्षित होते. 

      सामाजिक कार्यकर्ता जगदीपसिंघ नंबरदार यांनी ॲड. मृगेश नारवडकर यांच्यामार्फत याचिका क्रमांक- 1005/2022 नुसार उच्च न्यायालयात निवडणूक घेण्याची मागणी केली होती. याबाबतच्या 26 एप्रिल 2024 च्या सुनावणी करिता राज्य शासनाने शपथपत्र दाखल करून नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियमाचा मसुदा मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट उपसमिती समोर विचाराधीन असून तो मंजूर होऊन नवीन कायदा अस्तित्वात येईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही असे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंगेश पाटील व शैलेश ब्राह्मे यांच्या खंडपीठासमोर सादर केले होते. त्यास एक वर्षाचा कालावधी लोटला असला तरीही राज्य सरकार निर्णय घेण्यास उदासीनता दाखवीत असल्याने याबद्दल याचिकाकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी नाराजी व्यक्त करीत तात्काळ निवडणूक घ्यावी अन्यथा पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाईल असा इशारा दिला आहे........



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या