🌟उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी केले आवाहन🌟
परभणी (दि.१८ मार्च २०२५) : ९६-परभणी मतदार संघाअंतर्गत सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दतु शेवाळे यांनी केले आहे. मतदारयाद्यांची विश्वासार्हता अबाधित राहण्याकरिता, मतदारयाद्या अचूक व दोष विरहित असणे आवश्यक आहेत. मतदारयाद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका महत्वाची असल्याने मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या संदर्भात राजकीय पक्षांच्या सूचना विचारात घेण्यासाठी ९६-परभणी विधानसभा मतदार संघाअंतर्गत सर्व राजकीय पक्षाची बैठक आज तहसिल कार्यालय, परभणी येथे संपन्न झाली. या बैठकीस सहायक मतदार नोंदणी अधिकारी संदीप राजापुरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाच्या उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी परभणी यांचे पत्र क्रमांक २०२५/निवडणूक/कावि दिनांक १२ मार्च २०२५ अन्वये राजकीय पक्ष हे मतदारयाद्या तयार करण्याच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग असून मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांशी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करुन त्यांच्या सूचना घेण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांचे स्तरावर सर्व मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांसोबत बैठक घेऊन राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी यांनी ३१ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या बैठकीस उपस्थित राजकीय पक्ष प्रतिनिधींना ९६-परभणी विधानसभा मतदार संघाअंतर्गत एकूण ३३८ मतदान केंद्राबाबत, एकूण मतदार संख्या ३ लक्ष ५३ हजार २५१ इतकी असून यापैकी पुरुष १ लक्ष ८० हजार ४६ तर महिला १ लक्ष ७३ हजार १९६ व इतर ९ अशी असल्याबाबत तसेच उपस्थितांना मतदार यादीमध्ये नावनोंदणी करण्याच्या सर्व प्रक्रियेबाबत यथोचित माहिती तहसिलदार संदीप राजापुरे यांनी दिली. तसेच सर्व पात्र मतदारांनी मतदार हेल्पलाईन ॲपव्दारे अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदविणे आवश्यक असल्याबाबत माहिती दिली. मतदार यादी तयार करण्याचे अनुषंगाने उपस्थित प्रतिनिधींनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व बुध लेव्हल एजंटांमध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.....
0 टिप्पण्या