🌟या योजनेतील पात्र महिलांची छाननी केली जात असून तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात येणार🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना २१०० रुपये देणार असल्याचं महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं. तसंच, अर्थसंकल्पात वाढीव रक्कमेची घोषणा केली जाईल असंही त्यांनी कबुल केलं होतं परंतू आता अधिवेशन सुरू असतानाही त्याची अद्याप घोषणा झालेली नाही. तसंच, याच अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल, असं कोणीही म्हणालं नसल्याचं सरकारने म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील पात्र महिलांची छाननी केली जात असून तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात येणार असल्याची भूमिका सरकारची आहे. यामध्ये कोणत्या निकषांतर्गत महिलांना अपात्र ठरवण्यात येणार याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. असं सांगत असतानाच लाडक्या असलेल्या गरजू महिला नक्की कोण ? याबाबत आज अजित पवारांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजाराच्या आत आहे, कुरपण करणारी, धुणीभांडी करणारी, झाडू पोछा करणारी, झोपडपट्टीत कष्टाचं जीवन जगणारी, निराधार महिलांना या योजनेसाठी पात्र आहेत. तसंच, ज्यांना त्यांची मुलं, मुली, सुना, जावई सांभाळत नाहीत, अशांना ही योजना आहे. त्यांचीही संख्या मोठी आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पैसे दिले गेले ते परत घेणार नाहीत. रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी दिली. होळीच्या निमित्ताने तीन हजार रुपये दिले. आदिती तटकरेंचाही या योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे. इतरही योजनांना न्याय देण्याचं काम महायुती सरकारचं आहे असं अजित पवार म्हणाले......
0 टिप्पण्या