🌟पवार महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलताना ते म्हणाले🌟
पुर्णा (दि.२७ मार्च २०२५) :- शिक्षणाने माणसाचे जीवन सुसंस्कृत आणि सुंदर बनते असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा सहशिक्षक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी केले ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या स्थानिकांसाठी लाभदायक उपक्रमांतर्गत मौजे कंठेश्वर येथे घेण्यात आलेल्या व्याख्यानात बोलत होते दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व या विषयावरील व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक श्री भारती, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार जगदीश जोगदंड, मारोती शेरकर, प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक दत्तरावजी कदम, माजी सरपंच संजय कदम, नरहरी कदम, पांडुरंग कदम, सरपंच हरिभाऊ कदम ,ज्ञानेश्वर कदम आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ.संतोष कुऱ्हे यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद करून व्याख्यानमालेचा उद्देश समजून सांगितला.
डॉ.दिलीप शृंगारपुतळे पुढे म्हणाले की, शिक्षणाने माणूस घडतो व माणसां माणसांनी समाज घडतो म्हणून शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व माणूस घडविण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. यासाठी सर्वांनी शाळेतील मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असून माणसां माणसांतील दरी मिटविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात भरपूर काम करण्याची गरज आहे . प्रत्येक घरामध्ये ग्रंथ असले पाहिजे व सर्वांनी सायंकाळी दोन तास एका ग्रंथांचे सामूहिक वाचन केले पाहिजे.तसेच मुलांनी मोबाईल ऐवजी ग्रंथ वाचन केले तर त्याचा फायदा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी होऊ शकतो.गावातील शाळा, ग्रंथालय इत्यादी सगळ्या सुविधा लोकसहभागातून जपल्या गेल्या पाहिजेत यासाठी सर्व ग्रामस्थांनी आवश्यक ते सहकार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तर पत्रकार जगदीश जोगदंड हे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की मोबाईल मुळे माणसांची वाचन संस्कृती नष्ट होत असून अनेक युवकांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून नको त्या विकृती वाढीस लागत आहेत. त्यासाठी मोबाईलचा अतिरेक टाळावा आणि मुलांनी पुस्तकांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. त्यासोबतच कौशल्यावर आधारित शिक्षण घेतल्यास आपण शेतीशी निगडित राहून उद्योग व्यवसाय करू शकतो. तेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून युवकांनी आपले कुटुंब स्थिर करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात असेही ते यावेळी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले मारोती शेरकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपण उच्च अधिकार पदापर्यंत पोहोचू शकतो. यासाठी युवकांनी परिश्रम घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला भारतीय सेनेमध्ये निवड झालेले पांडुरंग कदम ,शिक्षक म्हणून निवड झालेले ज्ञानेश्वर कदम तर गावचे पोलीस पाटील म्हणून ज्यांची निवड झाली असे गजानन कदम यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी विचार मंचावर माननीय दत्तराव कदम संजय कदम नरहरी कदम हरिभाऊ कदम महाकालीदास पोलीस पाटील गजानन कदम आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कदम यांनी केले तर आभार पांडुरंग कदम यांनी मानले या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील गावकरी,तरुण मंडळी व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. संतोष कुऱ्हे यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या