🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे🌟
✍️ मोहन चौकेकर
महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून तीव्र अशी संतापाची लाट उसळली होती अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते. सुरुवातीला बीड पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती. अखेर याप्रकरणावरुन प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला होता. यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. नुकतेच याप्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.
💫संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना तूर्त सहआरोपी केले जाणार नाही :-
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना तूर्त सहआरोपी केले जाणार नाही, चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही कुठलीही कार्यवाही नाही. राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष असणार आहे.
💫वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळख :-
वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता. धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती, असे सांगितले जाते. वाल्मिक कराड याने आवादा या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावरुन कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद होते. या वादातून वाल्मिक कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. हा सुरक्षारक्षक मस्साजोग गावातील असल्याने सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले होते. त्याठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली होती. 6 डिसेंबर 2024 रोजी हा वाद झाला होता. त्यानंतर या भांडणाचा डुख मनात ठेवून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर राज्यभरात तिव्र अशी संतापाची लाट उसळली होती.
🔴धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर कोण काय काय म्हणाले ?
💫धनंजय मुंडेंचा राजीनामा मी स्वीकारला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी त्यांना मुक्त करण्यात आलेले आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
💫इतके दिवस कोणाची वाट बघत होतात? - जितेंद्र आव्हाड
तुम्हाला माहिती होती आणि फोटो सरकारकडे होते तर ते इतके दिवस का थांबले?, कोणाची वाट तुम्ही बघत होता?,दबाव असेल किंवा काही असेल राजीनामा घेण्यासंदर्भात भूमिका उशिरा का घेतली?, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन देखील केले.
💫खरंतर उचलून फेकायला हवं होतं - अंजली दमानिया
आज राज्य सरकारनं राज्यावर मोठे उपकार केले आहेत. खरंतर यांना उचलून फेकायला हवं होतं, असं समाजसेविका अंजली दमानिया म्हणाल्या. काल समोर आलेले फोटो, त्यात काय आहे हे संपूर्ण राज्याला माहिती होतं. तरी तीन महिने लागतात?, कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांना माहिती होती, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.
💫आरोपींना भरचौकात फाशी द्यायला हवी - आदित्य ठाकरे
धनंजय मुंडेंनी राजिनामा दिला आहे. मात्र हे सरकारचं बरखस्त करायला हवं. राज्यात मुली महिला यांच्यावरील अत्याचार वाढत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आम्ही नागपूरात राजीनाम्याची मागणी केली. आम्ही तर करतच होतो मात्र भाजपचे नमिता मुंदडा व सुरेश धस यांनीही केले. मात्र मुख्यमंत्र्यांचे हात बांधले गेले होते. काल जे भयानक फोटो आले डोळ्यात पाणी होत. कुटुंबियांची अवस्था काय झाली असेल ते पाहून आम्हीही स्वत: हादरून गेलो. फक्त राजीनाम्याची कारवाई नको तर चार्जशिटमध्येही नाव हवं. मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करायला हवी होती. बीडमधील परिस्थिती पाहून सरकार बरखास्त व्हायला हवं. या आरोपींना भरचौकात फाशी द्यायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
💫देवाची काठी लागत नाही, पण न्याय नक्कीच होतो - सुरेश धस
देवाची काठी लागत नाही, पण न्याय नक्कीच होतो अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी धनंजय देशमुखांच्या राजीनाम्यावर दिली.
💫 हा राजीनामा नाही,हकालपट्टी - करुणा शर्मा
धनंजय मुंडेंचा हा राजीनामा नाही, तर हकालपट्टी आहे. तीन महिन्यांनी का होईना राजीनामा झालाय. या माणसाला मंत्रापदाचीही शपथ देऊ नका हे मी सांगत होते,असं करुणा शर्मा म्हणाल्या.
🌟मी कार्यक्रम झाल्यावर माहिती घेऊन पत्रकारांशी बोलते - पंकजा मुंडे
मी विमानातून आताच उतरले आहे, मला याबद्दल अजून काही माहिती नाही. राज्यपाल महोदयांसोबत मी आहे. मी कार्यक्रम झाल्यावर माहिती घेऊन पत्रकारांशी बोलते, असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
💫देवगिरीवर झालेल्या कालच्या बैठकीत काय काय घडलं ?
देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते .देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणांचं गांभीर्य सांगितलं. सरकारच्या भविष्यात वाढणाऱ्या अडचणी देखील देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत सांगितल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार यांनी घ्यावा, असेही सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता. अखेर काल अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती अशी चर्चा जनतेमध्ये नागरिकांत होते आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या