🌟परभणी पंचायत समितीतील शाखा अभियंता लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!

 


🌟लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने शाखा अभियंता अण्णासाहेब तोडे यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले🌟

 परभणी (दि.२४ मार्च २०२५) : परभणी पंचायत समितीत कार्यरत शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.

             १५ व्या वित्त आयोगामध्ये अंगणवाडीतील कंपाऊंड वॉल व नालीचे बांधकाम तक्रारकर्त्याने केले होते. या बांधकामाचे एमबी लिहिण्याकरीता परभणी पंचायत समितीत कागदपत्रे सादर केली ०४ मार्च २०२५ रोजी शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास संबंधित तक्रारदार भेटले परंतु एमबी लिहिण्याकरीता १० हजार रुपये द्यावे लागतील असे तोडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. ही रक्कम लाच असून ती तक्रारकर्ता यांना द्यावयाची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्यांनी लगेचच लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली.

             या खात्याच्या पथकाने १८ मार्च २०२५ रोजी लाच मागणीची पंचा समक्ष पडताळणी केली. त्यावेळी अण्णासाहेब किशनराव तोडे याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविल्याचे निदर्शनास आले. या खात्याच्या पथकाने २४ मार्च २०२५ रोजी सापळा रचला, तेव्हा शाखा अभियंता तोडे हा तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहाथ पकडला गेला. या खात्याच्या पथकाने तोडे यांची अंगझडती घेतली त्यात रोख रक्कम १ हजार ३३० रुपये व मोबाईल सापडला पथकाने तातडीने तोडे यांच्या यशोधन नगरातील निवासस्थानी घरझडती घेतली त्यात रोख ५८ हजार ५०० रुपये आणि ८० ग्राम सोन्याचे दागिणे मिळाले.

            दरम्यान, पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगार, पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती माधुरी यावलीकर (नांदेड), एएसआय निलपत्रेवार, अनिरुध्द कुलकर्णी, सीमा चाटे, अतूल कदम, नामदेव आदमे, जे.जे. कदम, ईश्‍वर जाधव, शाम गोरपल्ले, नामपल्ले आदी परभणी व नांदेडच्या कर्मचार्‍यांनी या कारवाईत सहभाग घेतला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या