🌟सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सभागृहात गदारोळ.....!

 


🌟सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंच्या अटकेची आक्रमक मागणी🌟

मुंबई :- सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना अटक करावी अशी मागणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी भाजपकडून आक्रमकपणे करण्यात आली. तर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी काय चौकशी करायची ती करा प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना सभागृहात चर्चा कशी करता असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांत दोन्ही सभागृहात खडाजंगी झाली.

दिवंगत सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिचा २०२० मध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी दिशा सालियनचे वडिल सतिश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणाचा नव्याने तपास करावा, माजी मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी भाजपचे मंत्री आणि आमदार दोन्ही सभागृहात चांगलेच आक्रमक झाले होते. विधानसभेत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित करून नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बलात्कार, हत्येचा आरोप झाल्यानंतर ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीला अटक होती तशीच याप्रकरणात माजी मंत्र्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच न्याय द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली. मंत्री राणे यांच्या मागणीला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही पाठिंबा दिला. याप्रकरणी माजी मंत्र्यांना तात्काळ अटक करून चौकशी करावी अशी मागणी शंभुराज देसाई यांनी केली. मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देतांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी सुरु आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र कोर्टाच्या निर्देशानुसार कारवाई करु असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. तर शिवसेना ठाकरे गटाकडून याप्रकरणी जी चौकशी करायची ती करा असे प्रत्युत्तर देण्यात आले.

💫सत्ताधारी व विरोधकांत विधान परिषदेत खडाजंगी :-

विधानपरिषदेत याप्रकरणी चर्चा सुरु असतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. याच दरम्यान शिवसेना (उबाठा) चे ज्येष्ठ नेते आ. अनिल परब यांनी मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दल काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपचे आ. चित्रा वाघ यांच्यावर कडाडून टीका केली. त्याचबरोबर आ. मनिषा कायंदे यांनी २०२० साली याप्रकरणी केलेल्या टिटचे वाचन केले. मनिषा कायंदे ह्या तर सरड्याला लाजवेल असा रंग बदलतात असा आरोप करीत विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्यांच्यावर कसलेही आरोप करु नका. मुळात न्यायप्रविष्ठ प्रकरणी सभागृहात चर्चा होवू शकते का असा सवाल सभापतींना विचारला. यावर चित्रा वाघ चांगल्याच संतप्त झाल्या. संजय राठोड यांना क्लिनचीट कशी दिली हे आधी तुमचे नेते उद्धव ठाकरेंना विचारा. तुमच्यासारखे ५६ परब पायाला बांधुन फिरते, असा घणाघात अनिल परबांवर केला. या गोंधळातच सभागृहाचे दोनवेळा कामकाज स्थगित करावे लागले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या