🌟भारताच्या शेजारील देश थायलंड,म्यानमारमध्ये भूकंपाने माजवला हाहाकार....!


🌟या नैसर्गिक आपत्तीत १५० वर लोक ठार झाले असून, ७५० जण जखमी म्यानमारमध्ये १४४ जणांचे मृतदेह सापडले🌟


यांगून/बँकॉक
:- भारताच्या शेजारील देश थायलंड व म्यानमारला शुक्रवारी सकाळी ११.५० वाजता महाभूकंपाचा तडाखा बसला. हे दोन्ही देश ७.७ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या नैसर्गिक आपत्तीत १५० वर लोक ठार झाले असून, ७५० जण जखमी झाले. या भूकंपात अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळल्याने मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. एकट्या म्यानमारमध्ये आतापर्यंत १४४ जणांचे मृतदेह सापडले असून, थायलंडमध्ये ६ जण ठार झाले आहेत.

या भूकंपात अनेक जण बेपत्ता झाल्याचे वृत्त असून, दोन्ही देशांत मदत व बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे. या भूकंपाचे धक्के भारतासह अन्य पाच देशांमध्येही जाणवले भूकंपामुळे थायलंडची राजधानी बँकॉक येथील निर्माणाधीन एक बहुमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या इमारतीच्या मलब्याखाली तीन जण ठार झाले, तर ८० जण बेपत्ता झाले आहेत.

म्यानमारने भूकंपामुळे सहा क्षेत्रांत व राज्यांमध्ये आणीबाणीची जाहीर केली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसरे मोठे शहर मंडालेजवळ होता. मुख्य धक्क्यानंतर भूकंपाचा दुसरा धक्का ६.४ रिश्टर क्षमतेचा होता. म्यानमारमध्ये अनेक वर्षांपासून यादवी सुरू असल्याने भूकंपग्रस्त भागात कशी मदत पोहचवली जाईल, हे कळू शकले नाही.'रेड क्रॉस' ने सांगितले की, वीज नसल्याने मंडाले व सागाईंग भागात व दक्षिणेकडील शान राज्यात पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमच्या पथकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

म्यानमारमध्ये भूकंप होताच जीव वाचवण्यासाठी लोक रस्त्यावर आरडाओरडा करत सैरावैरा धावत होते. म्यानमारमधील अनेक रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. भूकंपानंतर म्यानमारच्या मंडाले आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी घाबरून धावपट्टीवरच बसून राहिले. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती व अनिश्चिततेचे सावट होते. मंडालेतील एका मशिदीत १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडालेपासून १० किमीवर होता. म्यानमारच्या राष्ट्रीय विमान कंपनीने आपली काही उड्डाणे रद्द केली आहेत. म्यानमारमधील अनेक पॅगोडे उद्ध्वस्त झाले आहेत.

💫म्यानमारमधील एवा व सागाईंग क्षेत्राला जोडणारा ऐतिहासिक पूल कोसळला :-

म्यानमारमधील एवा व सागाईंग क्षेत्राला जोडणारा ऐतिहासिक पूल कोसळला आहे. हा पूल १९३४ मध्ये ब्रिटिशांनी बनवला होता चिनी प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे झटके चीनच्या युन्नान व सिच्युआन प्रांतातही बसले. म्यानमारच्या सीमेजवळील रुईली शहरात अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून अनेकजण जखमी झाले.

💫बँकॉकमध्ये बहुमजली इमारत कोसळली :-

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपाचे भयानक रूप पाहायला मिळाले. एका बहुमजली इमारतीचे काम सुरू होते. ही इमारत भूकंपामुळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या वरती क्रेन होती. इमारत कोसळल्यानंतर धुळीचे लोट परिसरात पसरले.

💫जलतरण तलावातील पाणी बाहेर वाहू लागले :-

बँकॉकमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर शहरात अलार्म वाजू लागले. घाबरलेले लोक उंच इमारतीतून शिडीवरून उतरू लागले. उंच इमारतींवर बनलेल्या जलतरण तलावातील पाणी भूकंपामुळे बाहेर वाहू लागले.

एका पर्यटकाने सांगितले की, मी कॅमेऱ्याचे उपकरण खरेदी करायला गेलो होतो. तेव्हा अचानक इमारत हलू लागली. मी पहिल्यांदा शांततेत चालायला सुरुवात केली. त्यानंतर इमारतीत आरडाओरड सुरू झाली. लोक एस्कलेटरवरून चुकीच्या दिशेने धावू लागले. मॉलच्या आतील भाग तुटू लागले. बँकॉकमध्ये रस्त्यावरच नागरिकांवर उपचार केले जात आहेत.

💫भारतीय दूतावासाने भूकंप पीडितांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी :-

थायलंडमध्ये भूकंपाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी बँकॉकच्या भारतीय दूतावासाने हेल्पलाइन व आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे. थायलंडमध्ये भारतीय नागरिक मदतीसाठी ६६ ६१८८१९२१८ या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

💫भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मदतीची तयारी :-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना मदत करण्यास भारत तयार असल्याचे जाहीर केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या