🌟महाराष्ट्र राज्यातील अपघातांचे वाढते सत्र लक्षात घेता आता वाहनचालकांची होणार 'अमली पदार्थ' चाचणी....!


🌟लवकरच चालकांची अमली पदार्थ सेवन चाचणी सुरू करण्यात येणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 


मुंबई : महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने वाढते अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत वाहनचालकांची मद्यपान तपासणी केली जात होती मात्र त्यात चालकाने अंमली पदार्थ सेवन केल्याचे कळत नव्हते. त्यामुळेच आता वाहनचालकाने अंमली पदार्थ सेवन केले आहे का नाही, याची चाचणी होणार आहे. परिवहन विभागातर्फे लवकरच चालकांची अमली पदार्थ सेवन चाचणी सुरू करण्यात येत असल्याचे सूतोवाच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केले.

वाहनचालकांची मद्यपान चाचणी करण्यासाठी 'ब्रेथ अॅनालायझर'चा वापर करण्यात येतो. त्यावर परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून विशेष मोहिमेद्वारे चाचणी केली जात होती. संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जात होती. अलीकडे काही वाहनचालकांनी कारवाई होऊ नये म्हणून मद्यपानाऐवजी अमली पदार्थ सेवन केल्याचे दिसून आले आहे. त्याला लगाम घालण्यासाठी ही चाचणी होणार आहे. या चाचणीमुळे चालकांचे मद्यप्राशन किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविण्याचे प्रमाण कमी होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल, सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षिततेची खात्री होईल आणि प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची हमी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

💫अंमली पदार्थ सेवन चाचणी वर्षभरात सुरू होणार :-

वाहनचालकांची अमली पदार्थ सेवनाबाबत चाचणी केली जाणार आहे, त्याबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात येणार असून वर्षभरात ही चाचणी सुरू होणार आहे, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या