🌟पुर्णेतील पवार महाविद्यालयात 'महिला कायदे विषयक जागृती' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते🌟
पुर्णा (दि.०८ मार्च २०२५) - भारतीय महिलांना संरक्षण देणाऱ्या विशेष कायद्याची भारतीय संविधानात तरतूद असून त्यामुळे भारतीय महिला सन्मानाने आपले जीवन जगत असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक तथा विधिज्ञ ॲड.राजेश भालेराव यांनी केले.पुर्णा शहरातील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आज शनिवार दि.०८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने 'महिला कायदे विषयक जागृती' या विषयावर घेण्यात आलेल्या व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना ॲड. भालेराव म्हणाले की, समाजात वावरताना स्त्री - पुरुष असमानता अनेक प्रसंगी पाहायला मिळते. परंतु भारतीय संविधानाच्या विविध कायद्याद्वारे महिलांना संरक्षण दिले असून समतेची वागणूक मिळावी ,स्त्री - पुरुष समानता निर्माण व्हावी अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे. स्त्रियांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत स्त्रियांना भारतीय संविधानाच्या कायद्याने संरक्षण दिले आहे लिंग निदान करणे,स्त्री अर्भकाचा गर्भपात करणे यावर बंदी घातली असून बालविवाह बंदी, बालकामगार कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, पोटगी ,सार्वजनिक ठिकाणी समान वेतन कायदा अशा वेगवेगळ्या कायद्याद्वारे स्त्रियांच्या जीवनात सन्मान वाढेल असेच संविधानातील कायद्याने संरक्षण दिले आहे म्हणून स्त्रियांनी शिक्षण घेऊन कायद्याचा अभ्यास केला पाहिजे व सन्मानाने जगायला शिकले पाहिजे असे त्यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनात सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. भीमराव मानकरे उपस्थित होते.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी स्त्री -पुरुष समानतेसाठी दोघांनीही संसारात समान वाटा उचलला पाहिजे म्हणजे कौटुंबिक संघर्ष होणार नाहीत व कायद्याची गरज वाटणार नाही स्त्री पुरुष दोघांनाही कौटुंबिक सहजीवनात समान सहभाग घेतला तर निश्चितच समाज जीवन व कौटुंबिक जीवन समृद्ध होईल असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सांगितले.
याप्रसंगी तृप्ती किरगे व परमेश्वर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या संयोजक डॉ.दीपमाला पाटोदे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी जोगदंड यांनी केले तर आभार प्रा. वैशाली लोणे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छकुली परडे, शिवानी जोगदंड, तृप्ती किरगे, प्रतिक्षा मुळे,श्रुती नांगरे, महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. याप्रसंगी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती......
0 टिप्पण्या