🌟मंदिराच्या गर्भगृहात भव्य कोरीव काम आणि त्याच्यासमोर मंडप बनवला आहे🌟
✍️ मोहन चौकेकर
अयोध्या : येथील श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन केला जाणार असून, त्यासाठी पांढर्या संगमरवराचे सिंहासन तयार करण्यात आले आहे. सोबतच, श्रीराम जन्मभूमी संकुलात चौदा विविध देवदेवतांची आकर्षक मंदिरे बांधली जात आहेत. त्या ठिकाणी शुभमुहूर्तावर मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.
तळमजल्याप्रमाणेच पहिल्या मजल्यावरही सिंहासन बनवण्यात आले आहे. मंदिराच्या गर्भगृहात भव्य कोरीव काम आणि त्याच्यासमोर मंडप बनवला आहे. त्याच्या खांबांवरही अप्रतिम नक्षीकाम करण्यात आले असून, त्यासाठी जयपूरचा गुलाबी दगड वापरण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी संकुलात बांधल्या जात असलेल्या चौदा मूर्तींच्या स्थापनेसाठी 30 एप्रिल (अक्षय तृतीया) आणि प्राणप्रतिष्ठा 5 जून (गंगा दशहरा) ही शुभ तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यावर मंदिर ट्रस्टकडून शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे.
💫जयपूरहून मूर्ती 30 एप्रिलपूर्वी येणार :-
राजस्थानातील जयपूरमध्ये राम दरबाराच्या सर्व मूर्ती तयार केल्या जात आहेत. त्या 30 एप्रिलपूर्वी अयोध्येत पोहोचतील. राम मंदिराच्या सीमा भिंत परिसरात सहा मंदिरे उभारली जात आहेत. यामध्ये भगवान सूर्य, गणेश, हनुमान, शिव, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांच्या मूर्ती स्थापित केल्या जाणार आहेत. याखेरीज सप्तमंडपात सात मंदिरे बांधली जात आहेत यामध्ये महर्षी वाल्मीकी, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वशिष्ठ, निषादराज, अहिल्या आणि शबरीच्या मूर्ती स्थापित केल्या जातील.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने यासंदर्भात कारसेवक पूरम येथे ज्योतिषींसोबत मूर्ती प्रतिष्ठापना, प्राण प्रतिष्ठापनेची शुभ वेळ आणि तारीख याबाबत बैठक घेतली. ज्योतिषींसोबत, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि बांधकाम प्रभारी गोपाळ राव बैठकीला उपस्थित होते. मूर्तींच्या स्थापनेसाठी अक्षय तृतीया (30 एप्रिल) आणि प्राणप्रतिष्ठेसाठी गंगा दशहरा (5 जून) ही सर्वोत्तम तारीख आहे, असे या बैठकीत ठरवण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, रामनवमीच्या दिवशी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत रामलल्लाचा अभिषेक केला जाईल. त्यानंतर दरवाजे सकाळी 10.30 ते 11.40 पर्यंत बंद राहतील. यानंतर, रामलल्लाला 11.45 पर्यंत सजवले जाणार आहे. यादरम्यान दरवाजे उघडे राहतील नंतर प्रसाद अर्पण केला जाईल आणि दारे बंद केली जातील.
💫रामनवमीला होणार सूर्यतिलक :-
रामलल्लाच्या जन्मासोबत दुपारी 12 वाजता आरती आणि सूर्यतिलक होईल. सूर्यकिरणे रामलल्लाचे कपाळ उजळून टाकतील. याचाच अर्थ असा की, सूर्यनारायण रामलल्लाला तिलक लावतील. भाविकांना स्वतःच्या घरातून या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल, अशी माहिती चंपत राय यांनी दिली श्रीराम जन्मभूमी संकुलातील मंदिरांचे बांधकाम झपाट्याने सुरू असून, ते जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल. सप्तऋषी मंदिरांमध्येही असेच बांधकाम करण्यात आले आहे.
- चंपत राय, सरचिटणीस, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या