🌟ब्लडबाथ शेयर बाजार पत्यासारखा कोसळला गुंतवणूकदारांच्या ८.८ लाख कोटींचा चुराडा.....!

               


🌟सेन्सेक्स १४१४ अंकांनी घसरला 🌟

व्यापक स्वरुपाच्या ट्रेड वॉरची भीती आणि अमेरिकेच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेने गुंतवणूकदारांना हादरवून सोडले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या रोजच्या नव्या वक्तव्याचे तीव्र पडसादही आशियाईसह भारतीय शेअर बाजारात उमटत आहेत. यामुळे सेन्सेक्स २८ फेब्रुवारी रोजी तब्बल १,४१४ अंकांनी घसरून ७३,१९८ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४२० अंकांच्या घसरणीसह २२,१२४ वर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची घसरण अनुक्रमे १.९० टक्के आणि १.८ टक्के एवढी होती.

सर्व १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सर्वाधिक फटका निफ्टी आयटीला बसला. निफ्टी आयटी निर्देशांक ४.१ टक्के घसरून बंद झाला. बीएसई मिडकॅप २.१ टक्के आणि स्मॉलकॅप २.३ टक्के घसरला.

💫Nifty 50 ची ऐतिहासिक घसरण :-

२८ फेब्रुवारीच्या बाजारातील मोठ्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ८.८२ लाख कोटींनी कमी झाले. त्याचबसोबत निफ्टी ५० निर्देशांक १९९६ नंतर पहिल्यांदाच सलग पाचव्या महिन्यांत घसरणीसह बंद झाला आहे. जागतिक कमकुवत संकेत, आणि ट्रेड वॉरच्या धास्तीने बाजारात आज चौफेर विक्रीचा मारा दिसून आला.

💫कोणते शेअर्स गडगडले ? :-

सेन्सेक्सवरील एचडीएफसी बँकेचा शेअर्स वगळता ३० पैकी २९ शेअर्स लाल रंगात बंद झाले. टेक महिंद्राचा शेअर्स ६ टक्के, इंडसइंड बँक ५.४ टक्के, एम अँड एम ५.२ टक्के, भारती एअरटेल ४.८ टक्के, इन्फोसिस ४.३ टक्के, टाटा मोटर्स ४.२ टक्के, टायटन ४ टक्के, नेस्ले ३.८ टक्के आणि टीसीएसचा शेअर्स ३.५ टक्के घसरला. तर एचडीएफसी बँकेचा शेअर्स १.८ टक्के वाढला.

 💫ग्लोबल ट्रेड वॉरची भीती :-

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ४ मार्चपासून कॅनडा आणि मेक्सिकोच्या उत्पादनांवर २५ टक्के शुल्क (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा केली आहे. तर याआधी त्यांनी २ एप्रिलपासून हे शुल्क लागू करण्याचे संकेत दिले होते. चीनमधून आयात वस्तूंवर अतिरिक्त १० टक्के कर लागू केला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे ट्रेड वॉरची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम बाजारात होत आहे.

💫आशियाई बाजारातही घसरण :-

आशियाई बाजारातही आज घसरण झाली. ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क करण्याच्या निर्णयानंतर हाँगकाँगमधील बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आले. हाँगकाँगचा बेंचमार्क हँगसेंग २ टक्क्यांहून अधिक घसरला. चीनमधील बाजारातही घसरण राहिली.                                                         

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या