🌟लोकशाही मार्गाने सत्याग्रह करणे गुन्हा आहे का ? : रविकांत तुपकर
✍️ मोहन चौकेकर
मुंबई :- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही 19 मार्चला मुंबईत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. अरबी समुद्रात कर्जाचे सातबारे व सोयाबीन बुडवून सत्याग्रह करणार आहोत. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनाला सरकार आणि बुलढाणा पोलिसांनी गालबोट लावले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना रातोरात झोपेतून उठवून फरफटत पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने अटक केली.
अंदाजे 250 वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघणार होता परंतू अचानक पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी सैरभैर झाले. हा प्रकार केवळ आंदोलन चिरडण्याचा नसून राज्यातील शेतकरी चळवळ मोडीत काढण्याचा कुटील डाव आहे. लोकशाही मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यामागे कोण आहे? त्यांचा हेतू काय आहे, हे न ओळखण्याइतपत आम्ही दुध खुळे नाहीत, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने आम्हाला लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन अथवा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच त्यांनीच दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला. खरेतर सरकारने आजही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, सोयाबीन आणि कापूस भावातील फरक द्यावा, कांदा- धान अशा सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, दूध उत्पादकांना अनुदान द्यावे. सरकारने आश्वासन दिलेल्या या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही आंदोलन करत नाहीत. परंतु शेतकऱ्यांना द्यायचे काहीच नाही अन न्याय- हक्काच्या मागण्यावर आंदोलनही करू द्यायचे नाही. हा कुठला न्याय आणि कायदा आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी आंदोलन करतो म्हणून माझ्या घरातील महिलांना सुद्धा पोलीस टॉर्चर करत आहेत. माझी आई, माझी पत्नी, माझी बहीण, काकू तसेच सरकारी नोकरीत असणाऱ्या सर्व नातेवाईकांना टॉर्चर केलं जात आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणे, सत्याग्रह करणे हा गुन्हा आहे का? आणि सरकार शेतकऱ्यांना एवढं का घाबरत आहे? सरकार आणि पोलिसांच्या भीतीमुळे नव्हे तर आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे मी सध्या भूमिगत आहे. आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. उद्या बुधवारी (दि.19) मार्चला आम्ही अरबी समुद्रात कर्जाचे सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहोत. सोयाबीन- कापूस बुडवून सरकारचे लक्ष वेधणार आहोत, असे रविकांत तुपकर म्हणाले.
💫आम्ही बापाच्या घामाच्या दामासाठी लढतोय :-
एवढी दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार आणि पोलिसांनी करू नये. इंग्रजांच्या राजवटीत सुद्धा एवढी दडपशाही नव्हती. अशा पद्धतीची कारवाई करून बुलढाणा पोलिसांना नेमकं काय साध्य करायचं आहे. कोणाच्या इशाऱ्यावरून हे केलं जात आहे, हे न समजण्याइतके आम्ही दूधखुळे नाहीयेत. आम्ही घाबरणार नाही, डगमगणार नाही, आम्ही चोर, दरोडेखोर, दहशतवादी नाही आहोत. आम्ही बापाच्या घामाच्या दामासाठी लढतोय. आणि तो आमचा अधिकार आहे.
💫तर कर्जाचे सातबारे नव्हे, शेतकरी सरकारलाच अरबी समुद्रात बुडवतील :-
जग पोशिंदया शेतकऱ्याला एवढ्या हलक्यात घेण्याची चूक राज्यकर्त्यांनी करू नये. केवळ न्यायासाठी आंदोलन करतात म्हणून त्यांना पोलीस ठाण्यात डांबू नये. शेतकऱ्यांची सहनशीलता संपली तर कर्जाचे सातबारे नव्हे, सरकारलाच अरबी समुद्रात बुडवण्याची क्षमता मायबाप शेतकऱ्यांमध्ये आहे, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे, असे रविकांत तुपकर म्हणाले.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या