🌟 परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश🌟
परभणी - मानव विकास सायकल वाटप योजनेमध्ये अनियमिततता व अपहार झाल्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या तक्रारीवर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार या योजनेत अनियमितता झाली असून सायकल वाटपाच्या एकूण ४ कोटी ३ लक्ष ४५ हजार पैकी ५० लक्ष १ हजार ३७२ रुपयाचा अपहार झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला. यावर मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी सुनावणी घेतली असता तत्कालीन शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, परभणी यांनी रुपये ५० लक्ष १ हजार ३७२ रुपये इतक्या रक्कमेचा अपहार झालेला नसून संबंधीत रक्कम के.जी.बी.व्हि. मानव विकास योजनेच्या निर्वाह भत्ता व शिक्षक मानधनाकरीता अग्रीम म्हणून खर्च केलेला असून तत्कालीन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांनी यास मंजुरी दिली. मंजूर टिपणीसह लेखी खुलासा दिनांक ३० जुलै २०२४ व २६ ऑक्टोंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी परभणी यांना सादर केला.
मानव विकास सायकल योजनेच्या शासन निर्णय १६ फेब्रुवारी २०२२ नुसार संबंधीत रक्कम ही लाभार्थी मुलींच्या खात्यावरती सरळ वर्ग करणे (डि.बी.टी.) बंधनकारक असतांनाही तत्कालीन शिक्षणाधिकारी (मा.), जि.प.परभणी यांनी सदर रक्कम खात्यावर वर्ग न करता हि रक्कम निर्वाह भत्ता व शिक्षक मानधनावर नियमबाहय पध्दतीने खर्च केली व यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.परभणी यांनी या नियमबाहय कामास मंजूरी दिली हि अत्यंत गंभीर बाब आहे. करीता मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी लेखी स्वरुपात करण्यात आली होती.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारीनुसार २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. परभणी यांनी मानव विकास सायकल वाटप योजनेचे पैसे निर्वाह भत्ता व शिक्षक मानधनावर नियमबाहय पध्दतीने खर्च केल्या प्रकरणाची चौकशी करुन तात्काळ चौकशी अहवाल मा. जिल्हाधिकारी परभणी यांना सादर करावा, असे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी यांनी मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्या सूचनेवरुन काढले. प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या तक्रारीत तथ्य असल्यानेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे सुचना देण्यात आल्या असून चौकशी मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. परभणी व तत्कालीन शिक्षणाधिकारी (मा.) जि.प. परभणी हे दोषी आढळतील व त्यांच्यावर कार्यवाही होईल,असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाला आहे........
0 टिप्पण्या