🌟परभणी कृषि विज्ञान केंद्रा मार्फत महिला दिनाचे साजरीकरण....!

 


🌟यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.कविता सुभाषराव मेणे या होत्या🌟 

परभणी :- कृषि क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा वाढता सहभाग व योगदान या गोष्टी विचारात घेऊन भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली मार्फत “जागतिक महिला दिन” साजरा करण्याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कृषि विज्ञान केंद्र, परभणी मार्फत दिनांक. 08 मार्च, 2025 रोजी मौजे. इस्माईलपुर ता. जि. परभणी येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. सौ. कविता सुभाषराव मेणे, सहशिक्षीका, जिल्हा परिषद प्राथमीक शाळा, इस्माईलपुर, यांनी भुषविले तर उद्घाटक म्हणुन, मा. सौ. सविता भारत रन्हेर, प्रगतशील महिला शेतकरी या उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अरुणा खरवडे, डॉ. उषा सातपुते, सौ. मनिषा गीरी आणि डॉ. अमोल काकडे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अरुणा खरवडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात महिलांचे शेती व्यवसायातील बदलते स्वरुप, कृषि क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेबाबत योगदान, शेतकरी गट स्थापना करणे, कृषि पुरक व्यवसायातील संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.

 या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रगतशिल महिला शेतकरी सौ. सविता भारत रन्हेर, यांनी शेतकरी कुटूंबातील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवण्याचे अवाहन महिलांना केले. त्याचप्रमाणे शेतीमध्ये येत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचे महत्व पटवून सांगितले. सौ. कविता सुभाषराव मेणे, यांनी गावातील विकासामध्ये महिलांचे योगदान वाढविण्यासाठी आवाहन केले. तसेच गावामध्ये शेतकरी महिला गट स्थापन करण्याचा मानस व्यक्त केले.  

डॉ. अरुणा खरवडे, शास्त्रज्ञ, गृहविज्ञान, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकरी कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीपुरक गृहउद्योग व प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी आवाहन केले. तसेच महिला व मुलींचे आरोग्य, रोजच्या आहारामध्ये पौष्टिक मृणधान्य व पोषन बाग आधारीत भाजीपाल्याचे महत्व पटवुन दिले. 

डॉ. उषा सातपुते यांनी माती व पाणी परिक्षण, मातीचा नमुना कसा काढावा, सघन व अतिसघन, दादा लाड  कापुस लागवड तंत्रज्ञान या विषयी सखोल माहिती दिली. सौ. मनिषा गीरी यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व व निविष्ठा तयार करणे व नैसर्गिक शेतीद्वारे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कसे वाढवावे या विषयी मार्गदर्शन केले. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन गावातील शाळकरी मुलींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर शेतकरी महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी व राजगीरा आधारीत विविध पाककला स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये शाळकरी मुली व महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला तसेच विजेत्यांना पारितोषिकही देण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेतील मुलींद्वारे बालविवाह प्रतिबंध कायद्यावर आधारीत बालनाट्य सादर करण्यात आले. 

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. अश्विनी देशमुख तर आभार प्रदर्शन सौ. मालन तरवटे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमात मौजे. इस्माईलपुर, गोविंदपुर आणि सारंगापुर ता. जि. परभणी येथील महिला शेतकरी आणि किशोरवयीन मुली मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या