🌟राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील सहा महिन्यात जाणार ?


🌟आमदार धनंजय मुंडे यांच्या पुर्व पत्नी करुणा शर्मा यांचा नवा खळबळजनक दावा🌟

मुंबई :- बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नुकतेच मंत्री पदाचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील येत्या सहा महिन्यात जाईल असा दावा त्यांच्या पुर्व पत्नी करुणा शर्मा यांनी केला आहे. जसा मंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचा दावा खरा झाला त्याच पध्दतीने मुंडे यांची आमदारकी देखील जाईल असा अंदाज शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या अटकेनंतर कराडचे निकटवर्तीय व तत्कालिन अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चौफेर मागणी होत होती. या राजीनाम्यासाठी धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा इशाराही दिला होता. उपोषणाच्या दोन दिवस अगोदर मुंडेंचे मंत्रीपद जाणार असल्याचा दावा केला आणि अवघ्या काही दिवसात धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात पहिली पत्नी करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाइन तक्रार केली होती. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधीच करुणा शर्मा यांनी येत्या सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकीही जाईल, असे ठणकावून सांगितले आहे. याविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, निवडणूक काळात धनंजय मुंडे यांनी दोनशे बूथ कॅप्चर केले होते. तसेच निवडणूक अर्ज दाखल करतांना पहिली पत्नी म्हणून माझे नाव टाकले नाही, आमच्या दोघात असलेल्या प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाचा संदर्भही दिला नाही. २०१४ पासून माझे नाव आणि माझ्या मुलाबाळांचे नाव टाकले नाही. यावर निवडणूक अधिकारी, कलेक्टर कोणीच ऑब्जेक्शन घेतले नाही. २०२४ मध्ये माझ्या मुलांचे नाव टाकले आणि माझे नाव गायब केले.

या विषयी मी दाखल केलेल्या न्यायालयीन खटल्यात मुंडे यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. यापूर्वी मी त्यांचे मंत्रीपद जाणार असे सांगितले होते ते गेले. आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. खोक्याचे घर तोडले आता वाल्मिक कराड आणि आमदार, मंत्र्यांचेही घर तोडायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या