🌟कामगार कर्मचाऱ्यांचे संयुक्त राज्य संमेलन यशस्वरित्या संपन्न......!


🌟कामगारांचा उत्साह आणि आक्रमकता यामुळे हे संमेलन अत्यंत प्रेरणादायी ठरले🌟 


✍️ मोहन चौकेकर 

मुंबई : मुंबई येथे २८ मार्च २०२५ रोजी महात्मा गांधी सभागृह, भोईवाडा, परेल या ठिकाणी आयोजित केलेले राज्य स्तरीय कामगार संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सभागृह पूर्णपणे ओसंडून गेले होते व कामगारांचा उत्साह आणि आक्रमकता यामुळे हे संमेलन अत्यंत प्रेरणादायी ठरले. १८ मार्च रोजी नवी दिल्ली येथे १० केंद्रीय कामगार संघटना व स्वतंत्र क्षेत्रवार फेडरेशन्स यांच्या संयुक्त मंचाने आयोजित केलेल्या चार श्रमसंहितांच्या अंमलबजावणीच्या विरोधात आणि १७ कलमी मागणीपत्रावर लढण्याचा निर्धार करण्यासाठी राष्ट्रीय कामगार संमेलन आयोजित केले होते. या राष्ट्रीय संमेलनाने दिलेल्या कार्यक्रमाचा पाठपुरावा म्हणून हे महाराष्ट्र राज्य स्तरीय कामगार कर्मचारी संमेलन आयोजित करण्यात आले होते. 


महाराष्ट्रातील काही मोजक्या सरकार व कॉर्पोरेट धार्जिण्या कामगार संघटना वगळता सर्व कामगार संघटना एकत्र येऊन स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कामगार, कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन करण्यासाठी डॉ. विवेक मॉन्टेरो- सिटू, दिवाकर दळवी- इंटक व त्रिशला कांबळे- एचएमएस यांची तांत्रिक कमिटी बनवण्यात आली होती. डॉ मॉन्टेरो यांनी प्रास्ताविक करून अध्यक्ष मंडळ व प्रमुख वक्त्यांच्या नावांचा प्रस्ताव मांडला व त्यानंतर अध्यक्ष मंडळाने मंडळाने कामकाजाला सुरवात केली. अध्यक्ष मंडळात इंटकचे गोविंदराव मोहिते, एनटीयुआयचे एम ए पाटील, भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके, आयटकचे उदय चौधरी, एचएमएसचे अशोक जाधव व सिटूच्या शुभा शमीम यांचा समावेश होता.  

संमेलनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सर्व प्रथम कृती समितीचे मुख्य समन्वयक व सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ डी एल यांनी आपल्या भाषणामध्ये केंद्र सरकारने १०० वर्षांपासून कामगारांनी लढून मिळवलेले कामगार कायदे रद्द करून करोनाच्या काळात फसव्या पद्धतीने लोकसभेत आणून मंजूर करवून घेतलेल्या चार श्रमसंहितांवर घणाघाती हल्ला चढवला. कामगार वर्गाचे सर्व अधिकार काढून घेऊन त्यांना वेठबिगार बनवणाऱ्या, कायम कामगार ही संकल्पना नष्ट करणाऱ्या, त्यांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या श्रमसंहितांना कडाडून विरोध करा, २० मेच्या संपात तमाम कामगारांना व जनतेला उतरवण्यासाठी व्यापक मोहीम करा आणि २० मे चा देशव्यापी सार्वत्रिक संप १०० टक्के यशस्वी करा असे आवागन करून, ‘श्रमसंहितांची अंमलबजावणी करू नका’ हा संमेलनाचा प्रमुख ठराव मांडला. त्यानंतर एचएमएसच्या वतीने संजय वढावकार यांनी जोरदार भाषण करून महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकावर खरमरीत टीका केली. त्यांनी विविध क्षेत्रातील कामगारांच्या १८ मागण्यांचा ठराव मांडला. एआयसीसीटीयुचे उदय भट यांनी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक मागे घ्या हा ठराव मांडला व कामगारांच्या आपल्या न्याय्य मागण्यांसाठी व केंद्र व राज्याच्या कॉर्पोरेट धार्जिण्या, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात होणारा लढा चिरडण्यासाठीच हा कायदा महाराष्ट्राचे युती सरकार आणत आहे आणि त्या विरोधात लढा करून ते मागे घ्यायला लावले नाही तर आपल्यावर हुकुमशाही प्रस्थापित होईल व आपण लढू शकणार नाही हे नमूद केले. आयटकचे कृष्णा भोयर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या खाजगीकण, कंत्राटीकरणाच्या धोरणावर कडाडून टीका केली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाच्या वतीने विश्वास काटकर यांनी २० मेच्या संपाला पाठिंबा दर्शवत राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी त्या दिवशी संपावर जातील व राज्य कारभार ठप्प करतील याची ग्वाही दिली. एचएमएसचे ज्येष्ठ नेते एस के शेट्ये व इंटकचे नेते गोविंदराव मोहिते यांनी संमेलनाला मार्गदर्शन केले. एनटीयुआयचे नेते मिलिंद रानडे यांनी कंत्राटी कामगारांना या लढ्यात उतरण्याचे आवाहन केले व चार श्रमसंहिता आणि जन सुरक्षा विधेयकावर खरमरीत टीका करून स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी नसलेल्या आरएसएस प्रणित भाजपने त्यांचाच वारसा पुढे नेत शहीद भगत सिंग यांनी ज्या ट्रेड डिसप्युट बिल व पब्लिक सेफ्टी बिल यांना विरोध करण्यासाठी लोकसभेत बाँब फोडला तेच दोन कायदे श्रमसंहिता आणि जन सुरक्षा बिलाच्या माध्यमातून कामगार वर्गावर आणि जनतेवर लादणाऱ्या भजपवर खरमरीत टीका केली. 

शिवसेनेचे नेते सचिन अहीर यांनी विधान सभा व परिषदेच्या आमदारांना घेरून जन सुरक्षा विधेयक मागे घेण्याबाबत भूमिका घ्यायला लावावी असे आवाहन केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव सुभाष लांडे यांनी या संपात डावे पक्ष उतरतील व संप यशस्वी करण्यासाठी कामगार वर्गाला सहकार्य करतील याची ग्वाही दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव व किसान नेते अजित नवले यांनी तीन शेतकरी विरोधी काळे कायदे वर्षभर लढून मागे घ्यायला लावले त्याच प्रमाणे श्रमसंहिता आणि जन सुरक्षा विधेयक मागे घेण्यासाठी लढा उभारण्याचे आवाहन करत २० मे रोजी संयुक्त किसान मोर्चा संपात उतरेल व ग्रामीण भारत बंद करून कामगार वर्गाला साथ देईल अशी ग्वाही आपल्या जोरदार भाषणामधून दिली अध्यक्ष मंडळाच्या वतीने शुभा शमीम यांनी कुमार केतकर, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे व तिश्ता सेटलवाड यांचे संमेलनाला पाठिंबा दर्शवणारे संदेश आल्याची माहिती दिली संमेलनाच्या शेवटी सोलापूरच्या प्रजा नाट्य मंडळीच्या टीमच्या क्रांतिकारी व प्रेरणादायी गीतांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. उपस्थित कामगार, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी घोषणांचा गजर करत सभागृह दणाणून सोडले व घोषणांच्या गजरातच संमेलनाचा समारोप करण्यात आला......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या