🌟समाज विकासासाठी शेती आणि आध्यात्मिक विश्‍वास महत्वपूर्ण - कुलगुरू प्रा. डॉ.इन्द्र मणि


🌟परभणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी आयोजित मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवात बोलताना ते म्हणाले🌟


 
परभणी (दि.०७ मार्च २०२५) : शेती आणि आध्यात्मिक विश्‍वास एकत्रितपणे समाजविकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. अध्यात्माच्या जोडीने विकासाचे कार्य करण्याची महाराष्ट्र आणि मराठवाड्याची संस्कृती असून ही बाब प्रसंशनीय आहे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी व्यक्त केले.

             अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित यांच्या वतीने आयोजित तीन दिवशीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव - 2025 चे उद्घाटन शुक्रवारी (दि.07) सकाळी  प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  खासदार संजय जाधव, गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे, गुरुपुत्र कृषिरत्न आबासाहेब मोरे, आयुक्त धैर्यशील जाधव, आत्मा परभणीचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे, तसेच सेवा मार्गाचे विभागीय प्रतिनिधी संदीपभाऊ देशमुख, डॉ. गोविंद साळुंके (बीड), माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेती आणि आध्यात्मिक विश्‍वास एकत्रितपणे समाजविकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. अध्यात्माच्या जोडीने विकासाचे कार्य करण्याची महाराष्ट्र आणि मराठवाड्याची संस्कृती आहे अन् ही बाब प्रसंशनीय आहे. या कार्यक्रमाचे आयोजक हे धार्मिक गुरु असून ते राष्ट्र विकास, कृषी विकास यातून समाजाचा विकास सतत साधत आहेत, ही गोष्ट कौतूकास्पद आहे.

             मराठवाड्यात कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे. विशेषतः गोदावरी तुरीच्या वाणाने महाराष्ट्रासह देशपातळीवर लौकिक मिळवला आहे. अनेक शेतकरी लखपती बनत आहेत. विद्यापीठ शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्यरत असून, शेतकर्‍यांना दर्जेदार तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण बियाणे, रोपे उपलब्ध करून देत आहे. आजच मराठवाड्यातील चार शेतकर्‍यांचा आणि दोन शास्त्रज्ञांचा राष्ट्रीय पातळीवर उत्तर प्रदेशात सन्मान होत आहे, ही बाब निश्‍चितच अभिमानाची असल्याचेही ते म्हणाले.

             शेतकर्‍यांसाठी विद्यापीठ दर महिन्याच्या दुसर्‍या बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञांना थेट शेतकर्‍यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मंगळवार व शुक्रवार सायंकाळी ऑनलाइन कृषी संवादही आयोजित केला जातो, असे ते म्हणाले.

यावेळी खासदार जाधव यांनी आपल्या भाषणातून मराठवाडा दुष्काळी भाग आहे. शेतीचे उत्पादन अल्प प्रमाणात आहे. परंतु, शेतकर्‍यांनी दिंडोरी प्रणित कृषि शास्त्र विभागाच्या माध्यमातून जर शेती केली तर ती नक्कीच फायद्याची ठरेल, असे म्हटले. तर आजमितीस आपण खात असलेल्या अन्नधान्यात विषारी अंश जास्त असल्यामुळे अनेक दुर्धर आजार उद्भवत आहेत, त्यासाठी जर विषमुक्त शेतीच्या माध्यमातून अन्नधान्य पिकवले तर नक्कीच अशा आजारांना आळा बसेल, असा विश्‍वास नितीनभाऊ मोरे यांनी व्यक्त केला.

            या कृषी महोत्सवात विभागीय कृषी प्रदर्शन, पूरक व्यवसाय प्रदर्शन, युवा प्रबोधन, कृषी दिंडी विज्ञान प्रदर्शन, मराठवाडा कृषी संस्कृती दर्शन, स्वयंचलित यंत्रसामग्री प्रदर्शन, बियाणे व पशुपालन मेळावा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठवाड्यातील हजारो शेतकरी, कृषी संस्था, संशोधक, विद्यार्थी आणि कृषी उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमासाठी सेवा मार्गाचे विभाग प्रतिनिधी डॉ. यशवंत राजेभोसले (माजलगाव), संतोष पाटील (छ. संभाजीनगर), विजय कडू पाटील (अहिल्यानगर), देशमुख (नांदेड), रवी पतंगे, अरविंद  देशमुख, सरपंच रमेश शेरे यांसह हजारो सेवेकरी, शेतकरी आणि भाविक या भव्य दिव्य मराठवाडा कृषी महोत्सवास उपस्थित होते.

💫दिंडीने परभणीकरांचे लक्ष वेधले :-

               मध्यवस्तीतील शनिवार बाजारातून हरिप्रसाद मंगल कार्यालयाासमोरुन सकाळी 9 वाजता महोत्सवाच्या निमित्ताने मोठी दिंडी काढण्यात आली. या दिंडीने नानलपेठ कॉर्नर, शिवाजी रस्ता, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, आर.आर. टॉवर्स ते विसावा कॉर्नरपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत मार्गक्रमण केले. या दिंडीत ध्वजधारी, कलशधारी महिला, भजनी मंडळे, लेझीम पथके, बंजारा झाकी, विविध देवतांच्या वेशभूषा असलेले सजीव देखावे, विविध पारंपाररिक नृत्य, शेती संस्कृती असलेली बैलगाडी व वेशभूषा साकारलेले सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या