🌟त्या स्फोटात १५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक🌟
सोल : दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या विमानातून आपल्याच देशात काही घरांवर अनवधानाने बॉम्ब पडले असून त्या स्फोटात १५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोचेऑनमध्ये लष्करी सराव केला जात होता. यावेळी लष्करी विमानातून बॉम्ब टाकण्यात आले. हे बॉम्ब मानवी वस्तीमध्ये पडल्याने अनेक घरे आणि चर्चचे नुकसान झाले आहे. या स्फोटानंतर परिसर हादरला होता. आजुबाजूचे लोक भयभीत झाले होते. उत्तर कोरियातून हल्ले सुरू झाल्याचा प्रथम गैरसमज पसरला होता. मात्र, नंतर आपल्याच देशाच्या विमानातून बॉम्ब टाकण्यात आल्याचे समोर आले.
राजधानी सोलपासून पोचेऑन हे गाव ४० किमी अंतरावर आहे. दक्षिण कोरियाच्या हवाई दलानुसार केएफ-१६ जेट विमानांमधून ५०० पौंड एवढ्या वजनाचे आठ बॉम्ब टाकण्यात आले. हवाई दलाने या घटनेवर खेद व्यक्त केला आहे, तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, असे म्हटले आहे. या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व लाइव्ह-फायर प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहेत. तसेच चौकशीसाठी एक पथक स्थापन करण्यात आले असून हवाई दलाने नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
वैमानिकाने केलेली ही चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याने बॉम्ब टाकण्याचे 'को-ऑर्डिनेट्स' चुकीचे टाकल्याने दुसऱ्याच ठिकाणी हे बॉम्ब फेकले गेल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. ग्रामीण भाग असल्याने आठ बॉम्ब पडूनही जास्त जीवितहानी झालेली नाही. अन्यथा मोठा अनर्थ ओढविला असता असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या स्फोटात दोन इमारती कोसळल्या आणि एका ट्रकचे नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या लष्करासोबत हा सराव केला जात होता.
0 टिप्पण्या