🌟नागपूर पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले संचारबंदी हटवण्याचे आदेश🌟
या दंगलीच्या घटनेनंतर नागपुरातील एकूण ११ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. यातील काही ठिकाणाची संचारबंदी गुरुवार दि.२० मार्च २०२५ रोजी उठवण्यात आली तर रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी नागपुर शहरातील सर्वच भागांमधील संचारबंदी उठवण्यात आली असल्याचे आदेश नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले आहेत नागपुरात उसळलेल्या दंगलीनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून ११ पोलिस स्थानकांच्या हद्दीत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते मात्र, दंगलग्रस्त भागाशिवाय अन्य परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे टप्प्याटप्य्याने संचारबंदी उठविण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. गुरुवारी नंदनवन व कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णतः हटविण्यात आली. तर शनिवारी पुन्हा पाच ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णतः हटविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. यामध्ये परिमंडळ ३ अंतर्गत येणाऱ्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज तसेच परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या सक्करदरा आणि इमामवाडाचा समावेश आहे.मात्र, यशोधरानगरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली होती. कोतवाली, तहसील, गणेशपेठमध्ये सायंकाळी ०७.०० ते रात्री १०.०० वाजतापर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. पण आज रविवारी दुपारी ०३.०० वाजल्यापासून शहरातील संपूर्णतः संचारबंदी उठविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचारबंदी उठविण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही संचारबंदी उठवण्यात आली आहे. नागपुरातील ज्या भागात तणाव निर्माण झाला होता, तेथील बहुतांश भाग हे बाजारपेठांचे आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचीदेखील शाळा बुडत होती. त्यामुळे शनिवारी पोलीस आयुक्तांकडून स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णतः हटविण्याचे निर्देश दिले.
मात्र, भालदारपुरा, मोमीनपुरा, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी यासह अन्य तणावग्रस्त भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. या भागातील संचारबंदी उठवली तरी सशस्त्र जवान अजुनही रस्त्यावर कायम ठेवण्यात आले आहे. तसेच पोलिसांची गस्तसुद्धा या परिसरात वाढविण्यात आली आहे. संचारबंदी हटवल्यानंतरही कुणी संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्यास किंवा संशयास्पद हालचाली करीत असल्यास ताबडतोब ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे.
0 टिप्पण्या