🌟निधी वितरीत केल्याने जिल्ह्यातील हळद संशोधनाला गती प्राप्त होणार🌟
✍️ शिवशंकर निरगुडे (हिंगोली)
हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अंमलबजावणीसाठी सन २०२४-२५ करिता आज ७ कोटी ८४ लक्ष ८० हजार रुपयांचा निधी आज वितरीत करण्यास मान्यता दिल्याने जिल्ह्यातील हळद संशोधनाला गती प्राप्त होणार आहे. परिणामी येथील हळद उत्पादक शेतक-यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
जिल्ह्यामध्ये 'मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र' कंपनी कायद्याच्या कलम ८ नुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास दि. 14 सप्टेंबर, 2022 रोजीच्या शासन निणर्यान्वये मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी दि. 30 जुलै, 2024 व 9 ऑगस्ट, 2024 रोजीच्या शासन निणर्यान्वये निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच, दि. 16 सप्टेंबर, 20024 व दि. 23 जानेवारी, 2025 रोजीच्या शासन निर्णयांन्वये योजनेसाठी सन 2024-25 करीता निधी वितरीत करण्यात आला आहे.
तसेच आता या योजनेकरिता आज गुरुवार, दि. 27 मार्च, 2025 च्या शासन निर्णयानुसार शासनाने मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता सन 2024-25 मध्ये २४०१४४४६ या लेखाशीर्षाखाली ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) उद्दिष्टांखाली रु. १८४.२० लाख व ३५-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान या उद्दिष्टांखाली रु. ६००.६० लाख असा एकूण रु. ७८४.८० लाख (रुपये सात कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार फक्त) निधी आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
हा निधी पीक संवर्धन, फलोत्पादन व भाजीपाला पिके, मसाला पिके, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद), संशोधन व प्रशिक्षण, कार्यक्रम लेखाशीर्षांतर्गत चालू वर्षी अर्थसंकल्पित केलेल्या तरतूदीतून खर्च करण्यात येणार आहे. या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेल्या रक्कमेचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरिता कृषि आयुक्तालय स्तरावर सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच जिल्हा स्तरावर लेखाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, हिंगोली यांना आहरण व संवितरण अधिकारी तर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ही योजना राबविताना शासन निर्णयातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी. वितरीत निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. तसेच सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तीकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित अटी व शर्तीचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही शासन निर्णयात दिल्या आहेत.......
0 टिप्पण्या