🌟सत्कर्मालाच देव मानणारे छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ - निवृत्ती महाराज इंदुरीकर


🌟शिवजयंती सोहळ्याचा आरंभ बुलढाण्यात उसळला शिवसागर🌟


✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज का श्रेष्ठ आहेत ?.. तर त्यांनी उपास-तापास न करता किंवा कुठलाही आव आणून कर्मकांड न करता कर्मालाच देव मानले. ते सत्कर्मामुळे सर्वश्रेष्ठ बनले. त्यामुळे संपत्ती सोबतच दयाभाव ज्यांच्याकडे होता, तेच छत्रपती होते.. असे शिवगुणगाण महाराष्ट्रातले गाजलेले विनोदी किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी करुन, बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या शिव जयंती सोहळ्याचा आरंभ दणक्यात केला.

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाच्या वतीने २०२५ सालच्या शिवजयंती सोहळ्याचा आरंभ शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ‘शिवनेरी’ जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानात ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या शिवकीर्तनाने झाला. अवघ्या दोनच दिवसापुर्वी ठरलेल्या या शिवकीर्तनासाठी जवळपास १५ हजार शिवप्रेमींचा जनसागर उसळला होता. सर्वत्र छत्रपती शिवरायांचा गजर सुरु होता. या शिव कीर्तनासाठी पुरुषांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. एकीकडे सूर्य मावळत असतांना, शिवजयंती सोहळ्याची पहाट बुलढाण्यात उजाडत होती.

सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या मुर्तीचे पुजन व दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे उद्घाटक धर्मवीर आमदार संजय गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसाई पतसंस्थेचे मार्गदर्शक नेत्रतज्ञ डॉ.वसंतराव चिंचोले, दौलतराव नरवाडे यांच्यासह आयोजक शिवजयंती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव उमेश शर्मा, प्रमुख पाहुणे अ‍ॅड.दिनोदे, माजी अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत, मृत्यूंजय गायकवाड डॉ.शोण चिंचोले, राजेश हेलगे, सुनिल सपकाळ, कोषाध्यक्ष अरविंद होंडे, निलेश भुतडा, प्रसिध्दी प्रमुख आदेश कांडेलकर, गोपालसिंग राजपूत यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सांस्कृतिक समिती पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांच्यासह तहसीलदार व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

ह.भ.प. इंदुरीकर महाराज पुढे बोलतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्याईने शेतकर्‍यांचे आई-वडील कुठेही वृध्दाश्रमात नाही. शेतकरी व गरीबांनी हा देश पिकवला. पोलिस, सैन्य, होमगार्ड आदी सेवेच्या क्षेत्रात गरीब व शेतकर्‍यांचीच मुले आहेत. छत्रपती शिवराय ग्रामविकास खात्याचे खरे निर्माते. छत्रपतींमुळेच देश अन् धर्म सुरक्षीत राहिला. सद्यस्थितीत शाळेमधून मोबाईल बंदीची खरी गरज आहे. आई-वडीलांची मान खाली जाणार नााही, असे जगा.. हीच खरी शिवजयंती, असेही ते म्हणाले. सुत्रसंचालन प्रा.अमोल वानखेडे यांनी केले. राष्ट्रगीताने शिवकीर्तनाची सांगता झाली......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या