🌟राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातुन सुसंस्कृत, जवाबदार व सुजाण नागरिक घडविले जातात - प्राचार्य डॉ अरुण नन्हई


🌟विकसित भारताचे स्वप्न साकारण्याची ताकद युवाशक्तीमध्ये - डॉ.नंदकुमार पालवे 

✍️ मोहन चौकेकर                               

चिखली :- विकसित भारताचे स्वप्न साकारण्याची ताकद युवाशक्तीमध्ये असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक स्व-विकासातून समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास साधण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इतर प्रलोभनांपासून दूर राहत आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सेवा संकल्प प्रतिष्ठान चे संस्थापक डाॅ. नंदु पालवे यांनी केले.

सर्वप्रथम शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन करत महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.माणव सेवा हीच ईश्वर सेवा या उक्ती ला अनुसरून पळसखेड सपकाळ या ठिकाणी मनोरूग्णांच्या सेवेचा वसा घेउन कार्य करणाऱ्या डाॅ. नंदु पालवे व आरती पालवे या उभयंतानी सेवासंकल्प प्रकल्प सुरू करून कृतीशील समाजसेवेचे मूर्तीमंत उदाहरण समाजा पुढे निर्माण केले आहे. या कार्यात समाजाने मला काय दिले यापेक्षा समाजाला मी काय देउ शकतो या उदात्त भावनेने खारीचा वाटा उचलण्यासाठी, परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ राहुलभाउ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 3 वर्षांपासून सेवासंकल्प येथे शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

दत्तक ग्राम पळसखेड सपकाळ येथे 07 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान अनुराधा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने चे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळेस ते उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळेस अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरूण नन्हई होते तर प्रमुख उपस्थितीत बाजार समिती संचालक तथा सरपंच मनोज लाहुडकर, प्रा. डाॅ. राजेंद्र कोकाटे, प्रा. डाॅ. राजेश मापारी, सामाजिक कार्यकर्ते सतिष मोरे, संजय मोरे हे होते.यावेळेस प्राचार्य डॉ.अरूण नन्हई म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी औपचारिक शिक्षणासोबतच चार भिंतींच्या बाहेरील समाजशिक्षण आवश्यक असते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला जाणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावखेडी, तेथील समाजकारण, अर्थकारण समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. अशा अनुभवातून विद्यार्थी सामाजिक दृष्ट्या समृद्ध होतात. शिबिरात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थी स्वयंशिस्त, सामाजिक कार्य करण्याची संधी व प्रेरणा, वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व अशा अनेक गुणांनी समृद्ध होतात. असे सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे घडविले जातात असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी निवासी कार्यक्रम अधिकारी प्रा. नागेश मापारी, प्रा. स्नेहल पाटील, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी प्रेम खंडारकर, ऋषी भोपळे, अनुराग कर्हाडे, हर्षल पालवे, यश जाधव, यश अपार, आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या